कल्याणमध्ये ओल्या पार्टीसाठी मित्राचा पाडला मुडदा - पुढारी

कल्याणमध्ये ओल्या पार्टीसाठी मित्राचा पाडला मुडदा

डोंबिवली;  पुढारी वृत्तसेवा : रात्रीची ओली पार्टी अर्थात दारू दिली नाही म्हणून मित्राचा अमानुषपणे खून करून पसार झालेल्या दोघा मारेकऱ्यांना अटक करण्यात कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे.

विशेष म्हणजे हत्या करून पसार झालेल्या या दोन्ही मारेकऱ्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 12 तासांत मुसक्या बांधणाऱ्या पोलिसांचे जिल्हा शहर पोलिस आयुक्त जयजित सिंग यांच्यासह बड्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

सुनिल गणेश चौधरी (27, सद्या राह. रामवाडी, टिळकचौक, कल्याण-पश्चिम) आणि लुटो कटकुल महलहार (26) अशी अटक केलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही सद्या कल्याण पश्चिमेतील टिळक चौकात असलेल्या रामवाडीत राहतात. तर मूळचे झारखंड राज्यातील गोड्डा जिल्ह्यातल्या नरोतमपूर, बिस्वास कहानी गावचे राहिवासी असलेल्या या दोघांना अधिक चौकशीकरिता कल्याण कोर्टाने 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शनिवारी 4 सप्टेंबर रोजी पहाटे 4 च्या सुमारास कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौकात दोघा अज्ञात इसमांनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून हत्याराने अजय झल्ले रावत या 24 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला चढविला. या जबर जखमी झालेल्या अजय रावत याला तात्काळ मुंबईतील सायनच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान त्याचा 12 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302, 34 अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर वपोनि यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि राजेंद्र अहिरे, सपोनि प्रमोद सानप, सपोनि घोलप यांच्यासह गिरीष पवार, बावीस्कर, बागुल यांनी दिवस-रात्र शोध मोहीम राबवली.

दोघा मारेकऱ्यांनी खुनाची कबूली दिली

मित्राचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांबाबत कोणताही धागादोरा नसताही खासगी गुप्तहेरांमार्फत माहिती मिळविली. तसेच या पथकाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करुन त्यांनी दिलेल्या मारेकऱ्यांच्या वर्णनावरून पुराव्याच्या आधारे अजय रावतच्या दोन्ही मारेकऱ्यांना टिळक चौकातील रामवाडी येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या साईटवरून बुधवारी 15 सप्टेंबरच्या संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान या दोघा मारेकऱ्यांनी खुनाची कबूली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी अजय रावत याच्याकडे दारूची मागणी केली होती. अजयने दारु पाजण्यास नकार दिल्याने सुनिल चौधरी आणि लुटो महलहार हे दोघे भडकले. रागाच्या भरात त्यांनी अजयवर लाकडी दांडक्याने हल्ला चढवला. यात तो उपचारादरम्यान मृत पावला. या गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि राजेंद्र अहिरे करत आहेत.

हेही वाचलत का :

ही गोष्ट चिमुरड्याच्या माध्यमातून भक्तीची नवी भाषा शिकवते

Back to top button