Mumbai : बापाने मुलीला नेल्यावर पत्नीने पती विरोधात नोंदवला अपहरणाचा गुन्हा | पुढारी

Mumbai : बापाने मुलीला नेल्यावर पत्नीने पती विरोधात नोंदवला अपहरणाचा गुन्हा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुलगीला सोबत घेऊन, पत्नीच्या राहत्या घराला कुलुप लावून तिला घरी जाण्यास मज्जाव केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पती आणि पीडित महिला दोघेही डॉक्टर आहेत. या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित आरोपी पती विरोधात नागपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नागपाडा पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील ३४ वर्षीय पीडित महिला या नागपाडा येथील बेलासीस रोड परिसरात राहतात. पतीने राहत्या घरात जाण्यास मज्जाव केल्याप्रकरणी त्यांनी नागपाड पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये संबंधित आरोपीसोबत पीडित महिलेचा विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले देखील आहेत. विवाहाच्या सहा महिन्यांनंतर या दोघांमध्ये भांडण होऊ लागले. आरोपी पतीने त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करून घर सोडून गेला. त्यानंतर तक्रारदार विवाहिता या दोन्ही मुलांसोबत एकट्याच घरी राहू लागल्या.

१ डिसेंबर रोजी तक्रारदार महिला या कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्यांची मुलगी आणि घरकाम करणारी महिला घरी होती. दुपारी तीनच्या सुमारास आरोपी घरी आला. त्याने घरकाम करणाऱ्या महिलेला उद्यापासून कामावर येऊ नकोस, असे सांगत घराबाहेर पाठविले. त्यानंतर त्याने मुलीला आपल्यासोबत नेत घराला कुलुप लावले. इमारतीच्या सुरक्षारक्षकालाही त्याने तक्रारदार विवाहिता यांना इमारतीत आणि फ्लॅटमध्ये प्रवेश द्यायचा नाही, असे बजावून तो निघून गेला. घरकाम करणाऱ्या महिलेने ही माहिती तक्रारदार विवाहितेला दिली. त्यानंतर विवाहितेने घरी धाव घेतली असता इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने तिला प्रवेश नाकारला. तक्रारदार विवाहिता यांनी नागपाडा पोलीस ठाणे गाठून मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली आहे.

हेही वाचा

Back to top button