चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार; संजय राऊत म्हणाले... - पुढारी

चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार; संजय राऊत म्हणाले...

मुबंई; पुढारी ऑनलाईन : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचं माझ्या कानावर आले होते, त्यामुळे त्यांनी मला माजी मंत्री म्हणू नका, असे म्हटले असावे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. ते मुबंईत पत्रकारांशी बोलत होते.

गुरुवारी चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत कळेल असे सांगितले.

त्यावरून तर्कवितर्क लढविले जात होते. त्याबाबत राऊत यांना विचारले असता, त्यांनी पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली.

संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. चंद्रकांतदादा हे अवतारी पुरूष आहेत.

चमत्कारी पुरूष आहेत. ते काहीतरी नक्कीच चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना मी समजू शकतो.

मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला २५ वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावं लागणार आहे.

कारण उद्धवजींच्या नेतृत्त्वात राज्यातील महाविकास आघाडी सरकार कायम राहणार आहे.

त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत.

त्यांना ऑफर आली आहे, असे मला कळाले आहे. त्यामुळे त्यांना माजी मंत्री म्हणून घ्यायचं नसेल.’

काय म्हणाले होते पाटील…

पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव मधील एका खासगी कार्यक्रमात सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेव्हा ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल’, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत पाटलांनी दिले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.

मराठा सेवा संघाचा प्रस्ताव

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या लेखामध्ये संभाजी ब्रिगेड आणि भाजपच्या युतीच्या पर्यायाचे सूतोवाच केले आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरण पहायला मिळणार का याची चर्चा होत असताना चंद्रकांत पाटील यांच्या मला माजी मंत्री म्हणू नका या वक्तव्यानं राज्यात आणखी काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button