मी घराबाहेर पडलो तर यांच्या पोटात गोळा आला : उद्धव ठाकरे | पुढारी

मी घराबाहेर पडलो तर यांच्या पोटात गोळा आला : उद्धव ठाकरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  आता बाहेर पडायला लागलो आहे. गेल्या शनिवारी बुलडाण्याला जाऊन आलो. दोन-अडीच वर्षांचा कालखंड तुम्हाला माहीत आहे. आधी कोविडमध्ये गेले, नंतर काही दिवस हे आजारपणात गेले. घरी होतो तेव्हा घराबाहेर केव्हा पडणार अले विचारत होते. आता घराबाहेर पडायला लागलो तर यांच्या पोटात गोळा आला आहे, अशा शब्दात शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

वांद्रे येथील लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती महोत्सवाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली यावेळी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्या टीकेला उत्तर दिले. आजारपणाचे कारण सांगून कोणाला न भेटणारे उद्धव ठाकरे सत्ता गेल्यानंतर मी घराबाहेर पडत असल्याची टीका राज यांनी मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात केली होती. त्याला उध्दव यांनी प्रत्युत्तर दिले.

यावेळी, ठाकरे यांनी शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती ही एकाच शक्तीची रूप आहेत, असे सांगत नव्या एकीकरणाची हाक दिली. या तिन्ही शक्ती एकवटल्या तर महाराष्ट्रातच नाही तर देशातही मोठी शक्ती बनेल, असा दावा त्यांनी केला.

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्यायला हवे. पण, यांना तर शिवाजी महाराजही जुने आदर्श वाटायला लागले आहेत. मुंबईतील एका मंत्र्याने तर गद्दारांची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आर्याच्या सुटकेसोबत केली. हा तर कहरच झाला. काय बोलायचे ते कळतंच नाही. छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केले नसते तर आजचे तुलना करणारे कुठेतरी कुर्निसात घालत बसले असते, असेही ठाकरे म्हणाले.

Back to top button