आता लढणारच नाही, तर करून दाखवणार : खासदार उदयनराजे | पुढारी

आता लढणारच नाही, तर करून दाखवणार : खासदार उदयनराजे

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वारंवार होणाऱ्या अवमानाबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे. मी हतबल झालेलो नाही, हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, आता लढणारच नाही, तर करून दाखवणार, असा इशारा त्यांनी आज (दि.३०) पत्रकार परिषदेत दिला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अवमानकारक विधान केल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. महाराजांवर चिखलफेक होताना आपण गप्प का बसायचे ? अशी उद्विग्नता व्यक्त करत अपमान करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. राज्यपालांप्रमाणे उद्या कुणीही बोलले तर आपल्याला चालेल का ? राज्यपालांचे वय पाहता त्यांना विस्मरण होऊ लागले आहे. राज्यपालांना वृद्धाश्रम पाहा, पण तेथेही घेतील का याची शंका आहे, असा टोलाही उदयनराजे यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, सर्वच पक्ष शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. त्यांना अभिवादन करतात. शिवराय अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी जाती धर्मात कधीही भेदभाव केला नाही. त्यांच्या विचारांमुळेच देशाची अखंडता टिकून आहे. शिवरायांनी प्रत्येकाचा सन्मान केला, त्यामुळेच भारतात लोकशाही आबाधित आहे.

परंतु, अलिकडे महाराजांच्या नावाचा वापर राजकारणासाठी केला जाऊ लागला आहे. यावर प्रत्येक राजकीय पक्षाने विचार करून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आधी देशाचे तीन तुकडे झाले, आता किती होतील याचा विचार करा, असे सांगून कुठल्याही पक्षांनी यामध्ये राजकारण आणू नये, असे आवाहन उदयनराजे यांनी केले. महाराजांचा विसर पडणार असेल, तर कसे होणार शिवरायांचा अपमान चित्रपट आणि लिखाणातून सुरू आहे. शिवरायांची तीन-तीन जयंती साजरी होत आहे. यातून त्यांची अवहेलना होत आहे, असेही ते म्हणाले. महाराजांची कुणीशीही तुलना होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button