Dharavi Redevelopment Project : धारावीचा पुनर्विकास गौतम अदानींकडे | पुढारी

Dharavi Redevelopment Project : धारावीचा पुनर्विकास गौतम अदानींकडे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : जागतिक पातळीवर तिसर्‍या क्रमांकावर झेप घेणार्‍या भारतीय महासत्तेच्या नकाशावरील धारावी झोपडपट्टी नावाचा काळा डाग लवकरच अस्तंगत होईल. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून बदनाम झालेल्या धारावीचे एका महानगरात रुपांतर करण्यासाठीची निविदा अदानी रिएलिटीने अखेर जिंकली. (Dharavi Redevelopment Project)

धारावीसाठी रिंगणात उतरलेल्या नमन ग्रुप आणि डीएलएफ या कंपन्यांना मागे टाकत अदानी समूहाने सर्वाधिक 5069 कोटी रुपयांची लावलेली बोली यशस्वी ठरली. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा सुमारे 20 हजार कोटींचा आहे. मोठी गुंतवणूक या प्रकल्पात होणार आहे. येत्या 17 वषार्र्ंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. आगामी सात वर्षांत संपूर्ण पुनर्वसन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. गेल्या 15 वर्षांत महाराष्ट्र सरकारने पुनर्विकासासाठी किमान चार प्रयत्न केले आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या राजवटीत या प्रकल्पाच्या उभारणीला प्रत्यक्ष मुहूर्त लागला. (Dharavi Redevelopment Project)

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे प्रमुख एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले की, धारावी पुनर्विकासासाठी आम्हाला तीन निविदा मिळाल्या. आम्ही अदानी आणि डीएलएफ कंपनीने दाखल केलेली आर्थिक निविदा उघडली. तिसरी कंपनी नमन समूह ही तांत्रिक निविदेत बाद झाली. अदानी समूहाने निविदेत 5,069 कोटी रुपयांची बोली लावली होती. तर, डीएलएफ कंपनीने 2,025 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे मुख्य चुरस अदानी आणि डीएलएफ यांच्यातच होती. अदानी समूहाची निविदा अंतिम झाल्याने पुढील निर्णय आता विशेष समिती घेईल.

अधिक वाचा :

Back to top button