जे बोलतो ते करतोच : देवेंद्र फडणवीस | पुढारी

जे बोलतो ते करतोच : देवेंद्र फडणवीस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मी जे बोलतो ते करतो, हवेत फुकाच्या गप्पा मारत नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना शनिवारी दिले. सरकार सावकारी पद्धतीने वीज बिल वसुली करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी चिखली येथील सभेत केला होता. शेतकर्‍यांबद्दल काही वाटत असेल; तर वीज बिल माफ करा, असे ठाकरे यांनी म्हटले होते.

याला उत्तर देताना फडणवीस यांनी, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री असताना शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईवर बोललेल्याच आणि आता सत्ता गेल्यानंतर बोललेल्याचा व्हिडीओ पोस्ट केला. ‘काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही,’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकर्‍यांबद्दल पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवला आहे, असेदेखील म्हटले आहे.

यानंतर दुसर्‍या ट्विटमध्ये फडणवीस यांनी महावितरणला वीज बिल वसुली थांबविण्यासाठी दिलेला आदेश पोस्ट केला आहे. या आदेशामध्ये कृषी बिलाच्या वसुलीसाठी चालू एका बिलाचा भरणा करून घ्यावा, जास्तीच्या थकबाकी वसुलीसाठी सक्ती करू नये, असे म्हटले आहे. या आदेशाच्या पोस्टवर त्यांनी जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असे म्हटले आहे.

Back to top button