बेळगाव, कारवार, निपाणीसह महाराष्ट्राच्या मागणीचा परिसर सोडणार असाल तर चर्चा शक्य : शरद पवार | पुढारी

बेळगाव, कारवार, निपाणीसह महाराष्ट्राच्या मागणीचा परिसर सोडणार असाल तर चर्चा शक्य : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेळगाव, कारवार, निपाणीसह महाराष्ट्राची मागणी असलेला परिसर कर्नाटक सोडणार असेल तर त्यांना काय देता येईल त्याबाबत चर्चा करता येईल. पण काही न करता फक्त मागणी करणे शहाणपणाचे लक्षण नाही. तिथे भाजपची सत्ता असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सीमावादावर भाजपला जबाबदारी टाळता येणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जतबाबत केलेल्या वक्तव्यावर दिले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत विविध विषयांवरून भाजपवर निशाणा साधला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले की, राज्यपालांनी सगळ्या मर्यादा सोडल्या आहेत. अशी वक्तव्य करणाऱ्यांकडे मोठी जबाबदारी देणे योग्य नाही. याचा निर्णय राष्ट्रपती व पंतप्रधानांनी घेतला पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जतबाबत केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले की, बेळगाव, कारवार, निपाणीसह महाराष्ट्राची मागणी असलेला सर्व परिसर ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल त्याची चर्चा करता येईल. सीमावादावर भाजपला जबाबदारी टाळता येणार नाही. तसेच दुसऱ्या राज्यात निवडणुका असताना आपल्या राज्यात सुट्टी देणे हे गेल्या ५० वर्षात झाले नाही. पण गुजरातमधील स्थिती ही कदाचित चिंताजनक वाटते, अशी शंका येणारी ही परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.

आत्मविश्वासाला धक्का बसला की ज्योतिषाची मदत घ्यावी लागते असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषांना भेटल्याच्या मुद्यावर लगावला. तसेच सत्तेचा गैरवापर करून आमच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचे पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईवर म्हटले.

हेही वाचा :

Back to top button