शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा पहिला टप्पा मार्चपर्यंत पूर्ण होणार : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा पहिला टप्पा मार्चपर्यंत पूर्ण होणार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम झपाट्याने सुरू आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. स्मारकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक जनतेला प्रेरणादायी ठरेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दादर येथील महापौर बंगला परिसरात जाऊन कामाची पाहणी केली. त्यानंतर आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकार्‍यांना सूचनाही केल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाले असून, मार्च 2023 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येईल. स्मारकाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जाईल, असे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बाळासाहेबांचे हे स्मारक जनतेचे असून, ते लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला समर्पित केले जाईल, असे सांगितले.

भाजप आ. प्रसाद लाड यांनी हे स्मारक शासनाने ताब्यात घ्यावे, अशी विनंती केली; पण उपमुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली नाही. बाळासाहेबांचे स्मारक हे जनतेलाच समर्पित राहील, असे त्यांनी ठासून सांगितले. एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांनी, राष्ट्रीय स्मारकाच्या महापौर निवासस्थानाचे वारसा संर्वधन व जतन करणे, प्रवेशद्वार इमारतीचे बांधकाम इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकाम प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आदी कामे प्रगतिपथावर आहेत, असे सांगितले.

Back to top button