‘भारत जोडो’ रोखण्याची शेवाळेंची मागणी राज्य सरकारने फेटाळली | पुढारी

‘भारत जोडो’ रोखण्याची शेवाळेंची मागणी राज्य सरकारने फेटाळली

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते, खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच रोखा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खा. राहुल शेवाळे यांनी केली. मात्र, याला जनताच योग्य ते उत्तर देईल, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे ही मागणीच फेटाळून लावली.

भारत जोडो रोखण्याची मागणी अचानक करण्यासाठी खा. शेवाळे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचीच निवड केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी संघर्ष टाळण्यासाठी शिंदे गटाने स्मृती दिनाच्या एक दिवस आधीच स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘वारसा विचारांचा’ या परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच खा. राहुल शेवाळे यांनी भारत जोडो यात्रेतील राहुल गांधी यांच्या सावरकरविरोधी वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला.

राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांबद्दल निंदनीय वक्तव्ये केली. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही यात्रा महाराष्ट्रातच थांबवावी. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, सावरकरांच्या विचारांचे राज्य आहे, हे दाखवून द्यावे, अशी मागणी केली. यापूर्वी जेव्हा काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केला तेव्हा स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी अय्यर यांच्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन छेडले होते. तसेच जोडे मारो आंदोलन आता राहुल गांधी यांच्याविरोधात करावे लागेल, असे शेवाळे म्हणाले.

खा. राहुल शेवाळे यांनी यात्रा रोखण्याची घोषणा करत जोडे मारो आंदोलनाबाबत केलेल्या विधानांमुळे शिंदे-फडणवीसांनीच या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र निर्माण झाले. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राहुल शेवाळे यांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करताना भारत जोडो यात्रा रोखण्याच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. तसेच जोडे मारो आंदोलनाबद्दलही कोणतीच घोषणा केली नाही. त्यामुळे खा. शेवाळे यांनी स्वतःच परस्पर भूमिका घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सावरकरांबद्दल राहुल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेताना शिंदे-फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा मात्र चांगलाच समाचार घेतला.

बोलण्यास मर्यादा आहेत : शिंदे

सावरकरांचा अपमान झाला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केले होते. आता सावरकरांचा वारंवार अपमान होत असताना बोटचेपे धोरण स्वीकारले जात आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ते म्हणाले, सावरकरांचा अपमान राज्यातील जनता सहन करणार नाही. बाळासाहेबांचा विचार छोडो, काँग्रेस जोडो, अशी यात्रा सध्या सुरू आहे. खरे तर भारत छोडो यात्रा असेच या यात्रेचे नाव ठेवले पाहिजे.
त्यावर सभागृहातून राहुल गांधींविरोधात बोलण्याची मागणी होऊ लागताच मुख्यमंत्री म्हणाले, आता मी मुख्यमंत्री आहे. मला मर्यादा आहेत, काही गोष्टी बोलायला. आम्हाला आचारसंहिता आहे.

जनताच उत्तर देईल : फडणवीस

सावरकरविरोधी वक्तव्ये केल्याबद्दल राहुल गांधी यांची भारत जोडो रोखण्याची मागणी बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे सावरकरांबद्दल बोलत आहेत त्यांना सावरकरांचा सा देखील माहीत नाही. कुणीतरी लिहून देतो आणि हे बोलतात. या बदनामीला उत्तर दिले पाहिजे. योग्यप्रकारे उत्तर देऊ आणि त्यांना जनताच योग्य उत्तर देईल. सावरकरांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतरही उपहासाचा कारावास भोगला. त्यांच्या विचारांना कारावासात टाकण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून रोज होतो आहे. रोज खोटे सांगितले जाते; पण याला महाराष्ट्राची जनताच उत्तर देईल.

Back to top button