पतीला वश करणे पडले ५९ लाखांना; कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी प्रियकराने महिलेला गंडवले | पुढारी

पतीला वश करणे पडले ५९ लाखांना; कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी प्रियकराने महिलेला गंडवले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक समस्या दूर करण्यासह पतीला वश करण्यासाठी विवाहीत महिलेची तिच्याच प्रियकरासह मित्राने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पवई परिसरात उघडकीस आला आहे. वशीकरणाच्या नावाने या महिलेकडून घेतलेल्या सुमारे ५९ लाख रुपयांच्या रोकडसह सोन्याचा दागिन्यांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी प्रियकरासह त्याच्या भविष्यवेता मित्राविरुद्ध पवई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बादल शर्मा आणि परेश गडा आहेत. अशी त्यांची नावे आहेत.

३९ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत अंधेरीतील मरोळ, मिलिटरी रोड परिसरात राहतात. त्यांचा कार्टेज आणि प्रिंटरचा व्यवसाय आहे. अंधेरीतील एमआयडीसी परिसरात त्यांची एल. पी. कार्टेज प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. त्यांच्या पत्नीचे बारा वर्षांपूर्वी परेश गडा याच्यासोबत प्रेमसंबंध होते. हा प्रकार नंतर तिच्या पतीला समजला होता. यावेळी त्यांनी आपसात ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या घटनेनंतर त्यांच्यात सतत खटके उडत होते. दिवाळीत तक्रारदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी तसेच इतर कामांसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे १३ ऑक्टोबरला त्यांनी ३५ लाख रुपये आणून घरातील कपाटात ठेवले होते. या पैशांबाबत त्यांच्या पत्नीला माहित होते.

पाच दिवसांनी त्यांनी कपाटातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता कपाटात पैसे नव्हते. यावेळी त्यांनी पत्नीकडे विचारणा केली असता तिने उडवाउडवीचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार त्यांनी त्यांच्या भावाला सांगितला होता. या माहितीनंतर तो त्यांच्या घरी आला आणि त्यांनी तिची आपुलकीने विचारपूस सुरू केली. यावेळी तिने घरातील कौटुंबिक वाद आणि पतीकडून होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. दरम्यान, तिची इंन्स्टाग्रामवरून भविष्यवेता बादल शर्मा याच्याशी ओळख झाली होती. त्याने जादूटोणाच्या माध्यमातून पतीला वश करता येईल, असे सांगून तिच्याकडून पैशांची मागणी केली होती. हा प्रकार तिने तिचा मित्र आणि पूर्वीचा प्रियकर परेश गडाला सांगितली होती. त्याच्या मध्यस्थीमुळे ती बादलच्या संपर्काति आली होती. त्यामुळे तिने परेशला ३५ लाखांसह घरातील साठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने दिले होते.

परेशने फसवणुकीच्या उद्देशाने तिची बादलशी ओळख करून तिच्याकडील पैशांसह सोन्याचे दागिने असा ५९ लाखां मुद्देमालाचा अपहार केल्याचे महिलेने दिराला सांगितले.

जादूटोणाविरोधी कायद्यान्वये होणार कारवाई

परेशने महिलेकडून फसवणुकीच्या उद्देशाने तिची बादलशी ओळख करून तिच्याकडील पैशांसह सोन्याचे दागिने असा एकूण ५९ लाखांचा ऐवज लाटला. फसवणुकीचा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी बादल शर्मा आणि परेश गडा यांच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना हकिगत सांगितली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी बादल शर्मा आणि परेश गडा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींनी जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला लुबाडल्याने त्यांच्यावर अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायद्यान्वयेही कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

Back to top button