11th Admission : राखीव कोट्यातील विद्यार्थी मिळेना | पुढारी

11th Admission : राखीव कोट्यातील विद्यार्थी मिळेना

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशात (11th Admission) इडब्लूएस कोट्यात 14 हजार 156 जागा असताना केवळ 72 अर्ज या यादीत आल्याने या जागा तशाच राहिल्या आहेत. तर इतर मागास प्रवर्गातही तीच अवस्था असल्याने याचा परिणाम या यादीवर मोठा झाला आहे. राखीव कोट्यातील जागा जास्त आणि विद्यार्थी कमी असे चित्र तिसर्‍या यादीत राहिल्याने अ‍ॅलोटमेंट कमी झाले असल्याचे दिसून आले आहे.

अकरावीची तिसरी यादी सोमवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आली. महाविद्यालयातील कोट्यातील जागांचा परिणाम या यादीवर प्रकर्षाने दिसून आला. या यादीत अनेक महाविद्यालयात कोट्यातील जागावर प्रवेश अर्ज कमी आणि त्या जागा सरेंडर न केल्यामुळे जागा फारशा उपलब्ध झालेल्या नाहीत.त्यामुळे त्याचा परिणाम प्रामुख्याने तिसर्‍या यादीवर झाला आहे.

दुसर्‍या यादीपेक्षा काही महाविद्यालयात अकरावी प्रवेशाच्या (11th Admission) तिसर्‍या यादीचे कटऑफ वाढले तरी काही महाविद्यालयात कमी झाल्याचे दिसून आले. अनेक महाविद्यालयांची यादी चक्क नव्वद टक्केपेक्षा अधिक वाढल्याचे दिसून आले.

पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी वाट पहाणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना तिसर्‍या यादीत प्रवेश मिळाला नसल्याचेही दिसून आले आहे. तर काही विद्यार्थी अजूनही प्रतिक्षेत आहेत असे दिसून येत आहे. इतर मागास प्रवर्ग आणि इडब्लूएस आदी प्रवर्गात अर्ज कमी जागा जास्त अशी अवस्था आहे. तर खुल्या वर्गात जागा कमी आणि अर्ज जादा असल्याने प्रवेश मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे.

पोद्दार महाविद्यालय, एचआर महाविद्यालयात जागा फुल्ल झाल्याने यादीच लागली नाही असे चित्र पहायला मिळाले. 80 ते 85 टक्के गुण मिळालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने प्रवेश घेतलेले नाहीत अनेकांना या यादीतही पसंतीचे महाविद्यालय मिळाले नसल्याचे दिसून आले. काही जणांनी सर्वच नामवंत महाविद्यालयांचा पसंतीक्रमात समावेश केल्याने त्या महाविद्यालयात जागाच शिल्लक नसल्याने प्रवेशच नसल्याचेही सांगण्यात आले.

गेल्या दोन यादीत प्रवेशाला फारसा परिणाम दिसलेला नाही यामुळे या यादीत कमी प्रवेश अलॉट झालेले आहेत. या यादीत 39 हजार 964 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. यामध्ये कला शाखेतील 3 हजार 152, वाणिज्य शाखेतील 25 हजार 539, विज्ञान शाखेतील 11 हजार 058 आणि एचएसव्हीसी शाखेतील 215 प्रवेश दिले आहेत.

Back to top button