भाजपने निवडणूक लढवली असती, तर ‘नोटा’इतकीच मते : उद्धव ठाकरे | पुढारी

भाजपने निवडणूक लढवली असती, तर ‘नोटा’इतकीच मते : उद्धव ठाकरे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कपट, कारस्थान आणि सत्तांतरानंतर राज्यात पहिली पोटनिवडणूक झाली. आमचे चिन्ह आणि नाव गोठवले गेले. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे. भाजपने ही जागा लढवली असती, तर त्यांना नोटा इतकीच मते मिळाली असती, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.

राजकीय लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे. ज्याप्रमाणे या निवडणुकीत एकजुटीने विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. विजयानंतर ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केले. निवडणूक चिन्ह महत्त्वाचे आहे; पण चिन्ह कोणतेही असले तरी जनता आमच्या सोबत आहे, हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असे ठाकरे म्हणाले.

आजच्या विजयाचे श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचे आहे. आगामी निवडणुका देखील आम्ही अशाच प्रकारे जिंकू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गुजरातमधील निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील प्रकल्प ओरबाडून नेले. आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागले आहे. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात, या शक्यतेचाही ठाकरे यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

देवेंद्र फडणवीसांना उत्तर

उद्धव ठाकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या बेईमानीचा बदला घेतल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले. यावर सर्व काही लोकांसमोर घडले आहे. आता कोण काय बोलत आहे, यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे लोक पाहत आहेत. हा द़ृष्टिहीन धृतराष्ट्र नसून उघड्या डोळ्यांनी पाहणारा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

Back to top button