बंडखोरांविरुद्ध ठाकरेंची मोर्चेबांधणी; ‘मातोश्री’वर जिल्हावार बैठका | पुढारी

बंडखोरांविरुद्ध ठाकरेंची मोर्चेबांधणी; ‘मातोश्री’वर जिल्हावार बैठका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी सध्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. पक्षसंघटना मजबूत करतानाच प्रत्येक बंडखोर आमदाराविरोधात स्थानिक पातळीवर तुल्यबळ आणि सक्षम पर्याय उभारण्यावर भर दिला जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी सोमवार, 31 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत जिल्हावार बैठकांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्या अंतर्गत मंगळवारी मराठवाड्यातील पदाधिकार्‍यांसोबत ठाकरे यांनी चर्चा केली. नव्या नेतृत्वाबाबत चाचपणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच, आगामी काळात संबंधित जिल्ह्यातील विधानसभा-लोकसभा मतदारसंघातील पक्षबांधणी तसेच नव्या नेतृत्वाबाबत चाचपणी करण्याचे काम ठाकरेंकडून केले जात आहे. विशेषतः शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना टक्कर देण्यासाठी योग्य व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. बंडखोरीचा फटका बसलेल्या प्रत्येक मतदारसंघात नव्या चेहर्‍यांच्या शोधात आजवर दुर्लक्षित राहिलेल्या शिवसैनिकांना जवळ करण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू आहेत. एकेकाळी निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे आमदार शिंदेसोबत गेले. या आमदारांसाठी अनेकदा स्थानिक पातळीवर इतर इच्छुक शिवसैनिकांना डावलले गेले. राजकीय संतुलन साधण्याच्या प्रयत्नात आजवर बाजूला पडलेल्या पदाधिकार्‍यांना पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बंडखोर आमदाराला टक्कर देण्याची क्षमता असलेल्या पदाधिकार्‍याला ताकद देण्याचे धोरण नेतृत्वाने स्वीकारले आहे.

Back to top button