आजपासून चारचाकींत सीटबेल्टची सक्ती! | पुढारी

आजपासून चारचाकींत सीटबेल्टची सक्ती!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : चारचाकी वाहनांतील मागच्या सीटवर प्रवास करणार्‍या प्रवाशांना उद्यापासून (1 नोव्हेंबर) सीटबेल्टची सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. अर्थात, मंगळवारपासून दहा दिवस जनजागृती आणि त्यानंतर प्रत्यक्षात दंडवसुली करण्यास सुरूवात होईल. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवता यावा म्हणून 31 ऑक्टोबरपर्यंत दिलेली 15 दिवसांची मुदत सोमवारी संपली.

शापूरजी पालनजी उद्योग समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या अपघातामुळे कारच्या मागील आसनांवर बसणार्‍या प्रवाशांना सीटबेल्ट सक्तीची घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. सीटबेल्ट वापरल्यामुळे अपघातात मृत्यूची शक्यता 45 टक्क्यांनी कमी होते.

सीटबेल्ट नसेल तर फिटनेस सटिर्फिकेट नाही

सीटबेल्टची सक्ती परिवहन विभागानेही मनावर घेतली असून, चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट नसल्याचे निदर्शनास आल्यास वाहन मालकाला फिटनेस सर्टिर्फिकेट देण्यात येणार नाही. रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, अवजड, जड यांसारख्या व्यावसायिक वाहनांची प्रथम दोन वर्षांनी एकदा तपासणी होते. त्यानंतर प्रत्येक वर्षी एकदा तपासणी करावी लागते. वैयक्तिक चारचाकी वाहनांची 15 वर्षांनी आरटीओमध्ये तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर दर पाच वर्षांनी वाहनाची तपासणी करावी लागते. मुंबई वाहतूक पोलिसांच्या आदेशानंतर फिटनेस सटिर्फिकेट मिळविण्यासाठी येणार्‍या वाहनांमध्ये सीटबेल्ट आहे की नाही हे पाहूनच फिटनेस सटिर्फिकेट दिले जाणार आहे. दरम्यान, सीटबेल्टवरून आता टॅक्सीचालक आणि प्रवाशांमध्ये वादाची शक्यता आहे. सीटबेल्ट लावण्यास प्रवाशानेच नकार दिल्यास त्याचा भुर्दंड चालकाला बसेल व त्यातून वाद होण्याची शक्यता आहे.

सर्वांनाच बेल्टसक्ती

मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 च्या कलम 194 (ब) (1) नुसार मोटरमध्ये सीटबेल्ट न लावलेल्या वाहनचालकास आतापर्यंत दंड होत होता. यापुढे सहप्रवाशांनाही सुरक्षाबेल्ट लावणे बंधनकारक आहे. सर्व प्रकारच्या कारसाठी हा नियम लागू असेल.

पाचव्या बेल्टचे काय?

काळी-पिवळी टॅक्सीत चालकासह पाच जण प्रवास करतात. पुढे दोन आणि मागे दोन बेल्ट असतात. मागे बसणार्‍या तिसर्‍या प्रवाशासाठी पाचवा बेल्ट आणायचा कोठून? या टॅक्सीची खासगी कारसोबत तुलना करू नये, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने वाहतूक विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी सीटबेल्ट जनजागृती मोहीम सुरू केली जी १० दिवस चालेल, त्यानंतर कारवाई केली जाईल. ११ नोव्हेंबरपासून जे कारमध्ये सीटबेल्ट न लावता बसलेले आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुंबई वाहतूक पोलिस विभागाने म्हटले आहे.

Back to top button