मुंबई : बंदीनंतरही पीएफआय सक्रिय; पनवेलमधून चौघांना अटक | पुढारी

मुंबई : बंदीनंतरही पीएफआय सक्रिय; पनवेलमधून चौघांना अटक

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (पीएफआय) केंद्र सरकारने बंदी घातली असतानाही या संघटनेच्या छुप्या कारवाया सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संघटनेशी संबंधित दोन पदाधिकारी पनवेल, नवी मुंबई येथे काही कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) मिळाली. त्यानुसार एटीएसच्या पथकाने गुरुवारी पहाटे छापेमारी करून पीएफआयचा पनवेल सचिव, पीएफआयचा राज्य विस्तार समिती सदस्य आणि दोन पीएफआय कार्यकर्ते अशा चार जणांना अटक केली आहे.

पीएफआय ही देशविरोधी आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतली असल्याच्या तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य पोलिसांच्या मदतीने गेल्या महिन्यात संघटनेच्या 15 राज्यांमधील प्रमुख नेत्यांसह सदस्यांच्या घर आणि कार्यालयांवर दोन वेळा छापेमारी केली होती. त्यात शेकडो जणांना अटकही झाली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली. केंद्राकडून संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानंतर स्थानिक पोलिसांसह राज्यातील तपास आणि गुप्तचर यंत्रणा संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यावर लक्ष ठेवून आहेत. अशातच संघटनेचे पदाधिकारी हे कार्यकर्त्यांसोबत नवी मुंबईतील पनवेल येथे बैठक घेणार असल्याची माहिती राज्य एटीएसला मिळाली. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास पनवेल, नवी मुंबई येथे छापेमारी करून अब्दुल रहीम याकूब सय्यद, मोईज मतीन पटेल, मोहम्मद आसिफ खान, तन्वीर हमीद खान यांना अटक केली आहे. यातील सय्यद हा पीएफआयचा पनवेल येथील सचिव आहे. अटक करण्यात आलेले हे चौघेही कोणा-कोणाच्या संपर्कात होते, त्यांची पुढील रणनीती काय होती, याबाबत चौकशी करण्यात येत असून या आरोपींजवळून मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.

पीएफआयच्या प्रदेशाध्यक्षाला मध्य प्रदेश एटीएसकडून अटक

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेला शेख नासेर ऊर्फ नदवी शेख साबेर (37, रा. बायजीपुरा) याला मध्य प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. मध्य प्रदेश एटीएसने अटक केलेल्या चौघांच्या चौकशीत त्याचे नाव समोर आल्याने त्याला औरंगाबादेतील हर्सूल जेलमधून अटक केली आहे. त्याला औरंगाबाद एटीएसने यापूर्वीच अटक केली होती.

औरंगाबाद एटीएसने 22 सप्टेंबरला पीएफआयच्या शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (37, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (28, रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान (29, रा. जुना बायजीपुरा), जालन्याचा अब्दुल हादी अब्दुल रऊफ (32, रा. रहेमान गंज) आणि शेख नासेर ऊर्फ नदवी शेख साबेर (37, रा. बायजीपुरा) या पाच जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत जालन्याचा जिल्हाध्यक्ष शेख उमर शेख हबीब (30, रा. पीर सावंगी, बदनापूर, जि. जालना. मु. आरेफ कॉलनी, गांधीनगर, जालना) याचे नाव समोर आल्यावर काही दिवसांपूर्वी त्यालाही अटक केली आहे. हे सर्व आरोपी हर्सूल कारागृहात आहेत. दरम्यान, यातील शेख नासेर ऊर्फ नदवी हा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे. त्याचे नाव मध्य प्रदेशात अटक केलेल्या पीएफआयच्या चौघांनी घेतले. त्यामुळे एमपी एटीएसने त्याला अटक केली.

Back to top button