मुंबई; सुरेखा चोपडे : ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील 500 बी एस-6 प्रणालीच्या साध्या बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पहिल्या टप्यातील 110 बस दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बस कोल्हापूर आणि सांगली आगारांना देण्यात येणार आहेत, तर पुणे व सांगली विभागांसाठी प्रत्येक 60-60 बसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या वर्षअखेरीस आणखी 120 बस एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटीच्या ताफ्यात 15 हजार 500 बस असून यात साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या व भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध गाड्या आहेत. आता महामंडळाच्या राज्यातील सात विभागांकरिता साध्या बस पाच वर्षांकरिता भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. भाडेतत्त्वावर बस पुरविणे, त्याचे चालक, डिझेल आणि देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे.
एसटीचे आयुर्मान संपताच त्या भंगारात काढून त्याबदल्यात बांधणी करून नवीन गाड्या ताफ्यात येतात. वर्षाला आयुर्मान संपलेल्या गाड्यांची संख्या अधिक आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत नवीन गाड्या दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे बसची बांधणी करणे व त्याच्या देखभालीसाठी येणारा खर्च टाळण्यासाठी भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचा पर्याय पुढे आला.
धुळे 100, लातूर 60, सांगली 110, कोल्हापूर 60, रत्नागिरी 50, रायगड 50, पुणे 60.
उत्पन्न : टाळेबंदीपूर्वी एसटीमधून दिवसाला 60 लाख प्रवासी वाहतुकीतून 22 कोटी रुपये उत्पन्न मिळायचे. आता 13 हजार बसमधून सुमारे 28 ते 29 लाख प्रवाशांच्या वाहतुकीतून 14 कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे.