महिलांच्या तुलनेत पुरुषांचे हृदय कमजोर | पुढारी

महिलांच्या तुलनेत पुरुषांचे हृदय कमजोर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  महिलांच्या तुलनेत दुपटीहून अधिक पुरुषांमध्ये हृदयविकाराची समस्या असल्याचे राज्यातील एका पाहणीअंती आढळून आले. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने फेब्रुवारी 2021 पासून ते 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत स्टेमी महाराष्ट्र हा कार्यक्रम राबवला. यामध्ये 2225 रुग्णांत 623 महिला आणि 1602 पुरुष हृदयविकाराने ग्रस्त असलेले आढळले. हृदयविकारामुळे अकाली मृत्यू होऊ नये यासाठी नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत तपासणी सुरू आहे. महाराष्ट्रातील हा कार्यक्रम या तपासणीचाच एक भाग होता. राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये ही तपासणी करण्यात आली. त्यात 2.2 लाख ईसीजी काढण्यात आले. त्यात 98 हजार महिला तर 1.2 लाख पुरुषांचा समावेश होता. कोणतेही शुल्क न आकारता हे ईसीजी काढण्यात आले.

रुग्णांना आपल्या हृदयाच्या स्थितीची माहिती व्हावी, जेणेकरून ते पुढील उपचार घेऊ शकतील. राज्यात सुरू असणार्‍या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या रुग्णांवर उपचार केले जातील, अशी माहिती देण्यात आली. ज्या रुग्णांमध्ये गंभीर हृदयविकार आढळला, त्यांचे वय 60 ते 69 या दरम्यान होते. अर्थात यापेक्षा कमी वयाच्या लोकांमध्येही थोड्या-अधिक प्रमाणात हृदयविकाराची लक्षणे आढळून आली, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. प्रद्मजा जोगेवार यांनी दिली.

राज्यात शहरांसह ग्रामीण भागात असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये 183 आरोग्य केंद्रे उभारण्यात आली असून, त्यामध्ये हृदयविकारावर ऑनलाईन सल्ले दिले जातात. यामध्ये रुग्णाचा व्याधीचा इतिहास नोंद करून ठेवला जातो. त्या रुग्णाला उपचार मिळून तो रुग्णालयाबाहेर पडेपर्यंत त्याच्यावर नजर ठेवली जाते, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

तरुण वयोगटातील पुरुषांमध्येही महिलांच्या तुलनेत हृदयविकाराचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. हृदयविकाराचा धक्का बसलेल्यांत छातीमध्ये असह्य वेदना, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे अशी लक्षणे आढळली, असे ससून रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाचे सहायक प्रा. डॉ. हेमंत कोकणे यांनी सांगितले.

Back to top button