अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात! यापूर्वीही गमावले होते नगरसेवकपद | पुढारी

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात! यापूर्वीही गमावले होते नगरसेवकपद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. शनिवार 15 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करताना पटेल यांच्यावर असलेले विविध गुन्हे व महापालिका निवडणूक लढवताना दिलेले जातीचे बनावट प्रमाणपत्र याचा उल्लेख पटेल यांनी केला नसल्यामुळे शिवसेनेने आक्षेप नोंदवला. निवडणूक आयोगाचे शिवसेनेकडून लक्ष वेधून यावेळी आक्षेपही घेण्यात आला.

मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 81 मधून मुरजी पटेल, तर प्रभाग क्रमांक 76 मधून त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल निवडून आल्या होत्या. पण या निवडणुकीमध्ये त्यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार काँग्रेस व शिवसेनेने केली होती. अखेर पटेल पती-पत्नीचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते, तर त्यांच्या जागी दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवलेले काँग्रेसचे नितीन सलागरे व शिवसेनेचे संदीप नाईक यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्यात आले होते. हाच दाखला देत शिवसेनेचे संदीप नाईक यांनी आता मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. एवढेच नाही तर, पटेल यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे पटेल यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते.

  • नगरसेवक, आमदार पद बनावट जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे रद्द झाल्यानंतर त्या व्यक्तीला किमान सहा वर्षे निवडणूक
    लढवता येत नाही, अशी कायद्यात तरतूद आहे.
  • पटेल यांचे नगरसेवक पद रद्द होऊन चार वर्षेही झाली नाहीत. या नियमानुसार ते कोणतीही निवडणूक लढवू शकत नाहीत. हाच मुद्दा निवडणूक आयोगासमोर शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आला असल्याचे समजते.
  • निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांसह संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Back to top button