मुंबई : मिठी नदीच्या परिसरामध्ये मगरीची दहशत | पुढारी

मुंबई : मिठी नदीच्या परिसरामध्ये मगरीची दहशत

धारावी;  पुढारी वृत्तसेवा :  धारावीतील मिठीनदी लगत असलेल्या खाडीत अजस्र मगर दिसून आल्याने राजीव गांधी नगर आणि प्रेमनगरमधील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. मंगळवारी सकाळी महाराष्ट ? निसर्ग उद्यानात
फेरफटका मारण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांना उद्यानाला लागूनच असलेल्या खाडीच्या किनार्‍यावर एक अजस्र मगर आपल्या एका पिल्लासह विहार करताना दिसून आली.

खाडीतील चिखलात भर उन्हात उभ्या असलेल्या मगरीला पाहून पर्यटकांची पाचावर धारण बसली. पर्यटकांनी मगरीबाबत सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. काही पर्यटकांनी अजस्र मगरीचा फोटो काढला. अवघ्या
काही मिनिटातच खाडीत मगर फिरत असल्याची बातमी लगतच्या वस्तीमध्ये वार्‍यासारखी पसरली. मगरीला पाहण्यासाठी रहिवाशांची गर्दी उसळली. काही रहिवाशांनी अजस्र मगरीचे फोटो काढले तर काहींनी व्हिडिओ काढला. वनविभागाचे बचाव पथक दाखल झाले. मात्र भरतीची वेळ असल्याने मगरीला पकडणे अवघड होऊन बसले. उद्यानाचे कर्मचारी आणि वनविभागाचे बचाव दलाने घटनास्थळी तळ ठोकले असून लवकरच मगरीला पकडण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

धारावीतील खाडीत दिसणारी मगर पवई भागातील असून ती पावसामुळे किंवा शिकारीच्या शोधात मिठी नदीत आली असावी, असा अंदाज स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

Back to top button