मुंबई : बदल्यांवरून महिला उपायुक्तांमध्ये शह-काटशहाचे राजकारण | पुढारी

मुंबई : बदल्यांवरून महिला उपायुक्तांमध्ये शह-काटशहाचे राजकारण

मुंबई;  प्रकाश साबळे :  राज्यात सत्तांतरानंतर मुंबई महापालिका प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. या बदल्यांमध्ये दोन महिला उपायुक्तांच्या बदल्या आणि नियुक्त्या वादग्रस्त ठरल्या आहेत. मुख्यालयात घन कचरा व्यवस्थान विभागात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या डॉ. संगिता हसनाळे आणि परिमंडळ 1 च्या उपायुक्त चंदा जाधव यांच्यामध्ये बदली आणि नियुक्तीवरुन चढाओढ सुरु आहे. चंदा जाधव यांना
पुन्हा घनकचरा व्यवस्थापन विभागात नियुक्त केल्यामुळे डॉ. संगिता हसनाळे दुसर्‍यांदा रजेवर गेल्या आहेत. या दोन
महिला उपायुक्तांमध्ये रंगलेला हा कलगीतुरा महापालिका मुख्यालयात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी चंदा जाधव यांची दुसर्‍यांदा घन कचरा व्यवस्थापन
विभागात नियुक्ती केल्याने नाराज झालेल्या घन कचरा व्यवस्थापन व परिमंडळ 1 चा अतिरिक्त कार्यभार संभाळणार्‍या डॉ. संगिता हसनाळे मंगळवारपासून पुन्हा रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे परिमंडळ 1 चा कारभार
रामभरोसे आहे. त्यांना परिमंडळ 1 आणि घनकचरा व्यवस्थापन हे दोन्ही विभाग पाहिजे असल्याने त्या जाधव यांना या दोन्ही विभागात नियुक्त करण्यास विरोध दर्शवित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन महिला अधिकार्‍यांच्या भांडणात सामान्य जनतेची कामे कशी होणार, असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे.

डॉ. चहल यांनी 12 ऑगस्ट रोजी चंदा जाधव यांची उपआयुक्त परिमंडळ 1 मधून घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली केली होती. तर उपायुक्त संगिता हसनाळे यांची घन कचरा व्यवस्थापन विभागातून परिमंडळ 1 मध्ये उचलबांगडी केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या हसनाळे घरगुती कारण सांगून 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत रजेवर गेल्या होत्या. यामुळे उपायुक्त जाधव यांना परिमंडळ 1 मध्ये राहावे लागले. तर घनकचरा विभागाचा कार्यभार उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुर्‍हाडे यांच्याकडे देण्यात आला होता. या दरम्यान आयुक्तांनी 18
ऑगस्ट रोजी पुन्हा ऑर्डर काढून डॉ. संगिता हसनाळे यांना परिमंडळ 1 चा अतिरिक्त कार्यभार आणि घन कचरा व्यवस्थापन अशी दोन्ही महत्वाची खाते दिली. यामुळे नाराज झालेल्या चंदा जाधव यासुध्दा 10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत रजेवर गेल्या होत्या. मात्र 11 ऑक्टोबरला त्या मुंबईत आल्याने त्याच्याकडे कुठलाही पदभार नव्हता. यामुळे आयुक्तांनी 11 ऑक्टोबर जाधव यांची घन कचरा व्यवस्थापन विभागात पदस्थापना केली. 12 ऑक्टोबरला जाधव यांनी पदभार स्विकारला. त्यामुळे नाराज झालेल्या हसनाळे रजेवर गेल्या आहेत.

या सर्व प्रकारामुळे महापालिका आयुक्तसुध्दा हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडून कुठलीही
कडक पावले उचलली जात नाहीत. डॉ. हसनाळे या राजकीय वजन वापरून आयुक्तांच्या आदेशालाच केराची
टोपली दाखवित असल्याची चर्चा महापालिका मुख्यालयात रंगली आहे.

Back to top button