अंधेरी पोटनिवडणूक लढवण्यावरून भाजपमध्ये परस्परविरोधी सूर

bjp

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याबद्दल भारतीय जनता पक्षात दोन सूर उमटले आहेत. ही निवडणूक लढवावी असे काहींना वाटते, तर काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवल्यानंतर शिवसेनेची ताकद वाढली आहे. या निवडणुकीत पराभव पत्करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर परिणाम करून घेऊ नये, असे काही वरिष्ठ नेत्यांना वाटते. अंधेरीची पोटनिवडणूक लढवावी की नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना प्रथमच ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नव्या नावासह मशाल चिन्हावर अंधेरी पूर्वमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. शिवसेनेच्या चिन्हात बदल झाला असला तरी, त्याचा कोणताही प्रतिकूल परिणाम शिवसेनेवर नाही. शिवसेनेची या मतदारसंघातील बांधणी आणि त्यातही दिवंगत आमदार रमेश लटके यांचे काम ही उद्धव ठाकरे यांची जमेची बाजू होय. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे मोठे आव्हान अंधेरी पूर्वमध्ये निर्माण झाले व मतांचे गणितच बदलून गेले.

2014 व 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करून शिवसेनेचे रमेश लटके येथून निवडून गेले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे रमेश लटके यांना 62 हजार 773 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे अमीन कुट्टी यांना 27 हजार 951 मते मिळाली होती. शिवसेना व काँग्रेसच्या मतांची बेरीज 90 हजारपेक्षा जास्त होते. याच विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मते मिळाली होती. याचाच अर्थ शिवसेना व काँग्रेसचे मताधिक्य भाजपपेक्षा दुपटीने जास्त आहे.

शिंदे गटाचा प्रभाव नाहीशिवसेनेची मते फोडण्यासाठी भाजपने मनसेची साथ घेतली तरी, शिवसेना काँग्रेसची एकत्रित मते कमी करणे तितकेसे सोपे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचाही या निवडणुकीत फारसा प्रभाव नसल्याचे भाजपनेच केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक भाजपाने लढूवू नये, असा सल्ला दिला आहे. पोटनिवडणूक जिंकणे तितकेसे सोपे नसल्याचेही या नेत्यांनी पटवून दिले आहे. पोटनिवडणुकीत पराभव झाला तर याचा थेट परिणाम मुंबई पालिका निवडणुकीवर होईल, असे या नेत्यांनी निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असलेल्या नेत्यांना सांगितले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Exit mobile version