शिवसेना संपणार नाही; निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी : शरद पवार | पुढारी

शिवसेना संपणार नाही; निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठविण्याचा हंगामी आदेश निवडणूक आयोगाने शनिवारी दिला. आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट जोमाने वाढेल. वेगवेगळ्या चिन्हावर मी स्वत: निवडणूका लढलो आहे. चिन्हाचा काहीच फायदा होत नाही, लोकं ठरवतात, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.

धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव शिवसेना तूर्त कोणालाही वापरता येणार नाही, असे आदेश निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने जारी केले. शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने हा उद्धव ठाकरे यांना मोठा दणका समजला जात असल्याने राजकीय पटलावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, मुळात एखादा पक्ष किंवा संघटना शक्तीशाली असेल तर तो पक्ष ठरवेल तेच चिन्ह शेवटपर्यंत असेल, असे सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो निवडणूकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. नवीन चिन्ह घ्यायचं आणि निवडणूक लढवायची. आपण स्वत: यापूर्वी पहिली निवडणूक बैलजोडीवर, दुसरी गाय वासरू, चौथी पंजावर आणि आता घड्याळ चिन्हावर लढलोय. शक्तीशाली पक्षाला अशा परिस्थितीत अनेक वेळा विविध चिन्हावर निवडणूक लढवावी लागते. शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट जोमाने वाढेल. योग्य निर्णय दिले जातील याची खात्री नाही. त्यामुळे निवडणूकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. महाविकास आघाडीवर याचा काहीही परिणाम होणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना नाव वापराबाबत बोलतांना पवार म्हणाले की, यावर आपण काही बोलू शकत नाही. त्यावर उद्धव ठाकरे हेच सांगू शकतील. परंतु यापूर्वी कॉंग्रेसमध्ये दोन गट झाले होते. त्यावेळी कॉंगेस (इंदिरा) आणि कॉंग्रेस (एस) असे नाव वापरले होते. त्यामुळे आता जी पोट निवडणूक होईल त्यामध्ये शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), आणि इतर शिवसेना असे होऊ शकते, असा अंदाजही पवार यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविणार ही खात्री होतीच

शिंदे, ठाकरे या वादात शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोग गोठविणार हे अगोदरपासूनच माहिती होते. त्याची खात्री आपल्याला होतीच, असे म्हणत या निर्णयावर थोडेही आश्चर्य वाटले नाही. परंतु हे निर्णय घेतय कोण, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला.

 

 

हेही वाचा :

Back to top button