मुंबई : सेनाफुटीनंतरची पहिली लढत अंधेरीत; ठाकरेंची सत्त्वपरीक्षा | पुढारी

मुंबई : सेनाफुटीनंतरची पहिली लढत अंधेरीत; ठाकरेंची सत्त्वपरीक्षा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी (पूर्व) या मतदार संघात केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी मात्र 6 नोव्हेंबर रोजी होईल. शिवसेनेतील फुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक असून, नव्या राजकीय समीकरणांचा कस या पोटनिवडणुकीत लागेल.

बाहेर पडलेला शिंदे गट या पोटनिवडणुकीत उतरणार नाही. तसे झाले असते तर धनुष्यबाणाचा फैसला झाला असता. मात्र, हा मतदारसंघ भाजपचा असून, शिंदे गट पूर्ण ताकदीने भाजपच्या बाजूने अंधेरीत उतरलेला दिसेल. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट अशी ही लढत होईल. दुसरीकडे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा असेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी जाहीर केले. मात्र,

काँग्रेसचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे सत्तेसाठी एकत्र आलेली महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने शिवसेनेच्या पाठिशी उभी राहणार का, हा तूर्त प्रश्न आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणूनही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही पोटनिवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेसचा निर्णय लवकरच शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आल्यानंतर पाठिंब्याची घोषणा करण्याचा पवित्रा काँग्रेसमधील काही मंडळीनी घेतला होता. मात्र, मागील पोटनिवडणुकांचा दाखला देत तांत्रिक प्रश्न निर्माण करू नयेत, अशी भूमिकाही मांडण्यात येत आहे. काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याने राष्ट्रवादी नेत्यांशी चर्चा केली असून, अंधेरीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी करण्यावर दोन्ही पक्षांची तयारी झाल्याचे सांगितले जाते. लवकरच ही आघाडी जाहीर होईल, असे मुंबई काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. विशेषतः कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराने वेगळी भूमिका घेऊ नये, यासाठी शिवसेना नेतृत्वाने हस्तक्षेप केला होता. त्यामुळे अंधेरीच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेनेला मदत करणार असल्याचे हा नेता म्हणाला.

लटके विरुद्ध पटेलशिवसेनेने स्व. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनाच उमेदवारी दिली आहे. भाजपकडून मुरजी पटेल रिंगणात असतील. ऋतुजा लटकेंना एकूणच सहानुभूतीचा फायदा होतो की भाजप सत्तांतराच्या जोरावर ही जागा जिंकते हे पाहणे रंजक ठरणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजप असे संघर्षदेखील पाहायला मिळू शकतात. निवडणूक जाहीर होण्याआधीच दोन्ही पक्षांत निवडणूक कार्यालयावरून वाद उद्भवला आणि शाब्दिक चकमकी झडल्या. शेवटी पोलीस उपायुक्तांना मध्यस्थी करावी लागली होती. या वादात वादग्रस्त निवडणूक कार्यालय पोलिसांनी गोठवल्यानंतरच हे भांडण थांबले. भाजपने या पोटनिवडणुकीची जबाबदारी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर सोपवली असून, त्यांनी आक्रमक प्रचाराला सुरुवातदेखील केली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येला भाजपाने अंधेरी पूर्व येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालय सुरू केले. या
कार्यालयातून सर्व राजकीय डावपेच आखले जाणार आहेत. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रविवारी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेलार यांनी अधिकृत उमेदवार म्हणून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्या नावाचे सूतोवाच केले.

Back to top button