मुंबई : आर्थिक चणचणीतून पत्नी-मुलांची हत्या; स्वतःलाही संपवले | पुढारी

मुंबई : आर्थिक चणचणीतून पत्नी-मुलांची हत्या; स्वतःलाही संपवले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : डोक्यावर झालेले कर्ज आणि बहिणीच्या लग्नासाठी पैसे नसल्याच्या नैराश्यातूनच शकील जलील खान (34) या व्यापार्‍याने पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन स्वतः गळफास घेत आयुष्य संपविल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. अखेर तब्बल दोन महिन्यांनी शिवाजी नगर पोलिसांनी मृत व्यापारी खान याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

गोवंडीतील शिवाजी नगरातील इंदिरानगर झोपडपट्टीत खान हे कुटुंबासोबत रहात होते. त्यांचा पान, सुपारी विक्रीचा व्यवसाय होता. 29 जुलै रोजी त्यांनी पत्नी रजिया (25), मुलगा सरफराज (7), मुलगी अतिसा (3) यांना विष पाजले आणि स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ सर्वांना जवळच्या सरकारी रग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला होता. खान याच्यावर दीड लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच बहिणीच्या लग्नाचा खर्च देखील त्यांना करायचा होता. यामुळे ते अतिशय तणावाखाली होते. त्यातुनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

खान याच्यावर दीड लाखाचे कर्ज होते, अशी माहिती शिवाजी नगर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली. तसेच बहिणीच्या लग्नाचा खर्च त्यांना करायचा होता. मात्र पैसे मिळत नसल्यामुळे खान हे नैराश्येत गेले होते. याच तणावातून त्यांनी पत्नी आणि मुलांना शीतपेयातून विष देत स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच, वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून ही याबाबत पुष्टी मिळाल्याने खानविरोधात रविवारी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button