दसरा मेळाव्यापूर्वीच ठाकरे- शिंदे गटात सोशल मीडियावर युद्ध | पुढारी

दसरा मेळाव्यापूर्वीच ठाकरे- शिंदे गटात सोशल मीडियावर युद्ध

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार घमासान सुरू झाले आहे. शिवाजी पार्कसाठी झालेली न्यायालयीन लढाई, दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टोलेबाजीनंतर आता सोशल मीडियावर तुफान घमासान माजले आहे. खास दसरा मेळाव्यासाठी बनविलेल्या टिझरमधून थेट शरसंधान साधले जात आहे. विशेष म्हणजे जुन्या भाषणांतील निवडक वाक्ये आणि घोषणांचाच वापर त्यासाठी केला जात आहे. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या विधानांची तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या भाषणांचीच एकप्रकारे उजळणी केली जात आहे. दोन्ही बाजूंनी व्हिडीओ आणि व्हिडीओंचा भडीमार सुरू असून बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आम्हीच, याचा मात्र आवर्जून उल्लेख केला जात आहे.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम शिंदे गटाने आपला टिझर लोकांसमोर आणला. ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार आणि एक नाथ’ म्हणत हिंदुत्वाची हाक दिली. तर पाठोपाठ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप असणारे टिझर जारी करण्यात आले. ‘शिवसैनिक बाजूला करून मला शिवसेनाप्रमुख म्हणून मिरविता येणार नाही, ही माझी भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे’ या बाळासाहेबांच्या विधानाचा आधार घेत ‘आम्ही विचारांचे वारसदार’ असल्याचे या टिझरमधून सांगण्यात आले. पहिल्या दोन टिझरनंतर शनिवार आणि रविवारी थेट उद्धव ठाकरे यांच्याच भाषणांचा दाखला देणारे टिझर शिंदे गटाने जारी केले. ‘निष्ठा विचारांशी, लाचारांशी नाही’ अशी टॅगलाईम वापरत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करण्यात आला. काँग्रेससोबत कदापि युती करणार नाही, या विधानासह ठाकरेंनी आपल्या विविध भाषणात आघाडी सरकारवर केलेली टीकाच या व्हिडीओतून समोर आणण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्याच नव्हे तर स्वतःच्याच विधानांपासून, विचारांपासून फारकत घेतल्याचा आरोपच या निमित्ताने केला गेला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेने ‘गद्दार’ हाच ठपका शिंदे गटावर मारला आहे. विसर ना व्हावा हा टिझरचा भडिमार करत शिंदे गटाने गद्दारीच्या टीकेला प्रथमच थेट उत्तर दिले आहे.

शिंदे गटाच्या पहिल्या टिझरची खिल्ली उडविणार्‍या शिवसेनेनेही लागलीच टिझर जारी केला. शिवसेनेकडून आतापर्यंत अधिकृतपणे एकच टिझर आणला गेला आहे. मात्र, शिवसेनेशी संबंधित विविध अकाऊंटवरून मात्र मोठ्या प्रमाणावर व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. यात, एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून होणार्‍या अन्यायाविरोधात व्यासपीठावरूच मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या घोषणेचा वापर केला जात आहे. 2016 साली भाजप नको म्हणणारे आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याचा आरोप असणारे मीम्स्ही बनविण्यात आले असून शिवसैनिकांच्या व्हॉटस्अप ग्रुपवर ते फॉरवर्ड केले जात आहेत. याशिवाय ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाच्या क्लिप्स्ही मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केले जात आहेत.

Back to top button