अंबरनाथ नगरपरिषदेला जिल्हा परिषदेच्या शाळांच्या हस्तांतरणासाठी निधी मिळणार | पुढारी

अंबरनाथ नगरपरिषदेला जिल्हा परिषदेच्या शाळांच्या हस्तांतरणासाठी निधी मिळणार

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : अंबरनाथ नगरपरिषदेला हस्तांतरित झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या जागा, शिक्षक आणि वेतन अनुदान याबाबत नगरविकास विभाग आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, यासह अंबरनाथ शहरातील विविध कामांचे विकास आराखडे, पुनर्विकास यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

अंबरनाथ नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांच्या आढाव्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक पार पडली. ठाणे जिल्हा परिषदेच्या 18 शाळा अंबरनाथ नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित शाळा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे हस्तांतरण पूर्ण करण्याला शासनाने मान्यता दिली. तसेच यासाठी लागणारा निधी नगरविकास विभागाकडून देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्या शाळा शासकीय जागेत उभारण्यात आल्या आहेत. त्यांचे हस्तांतरण शासनाकडून केले जाईल. मात्र ज्या शाळा जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून उभारण्यात आलेल्या आहेत त्यांचे हस्तांतरण करताना जिल्हा परिषदेला निधी देऊन हस्तांतरण प्रकिया पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शिवाजीनगर येथील मार्केटचा पीपीपी तत्वावर पुनर्विकास

अंबरनाथमधील शिवाजीनगर मंडईचा पीपीपी – तत्वार पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुनर्विकासाच्या या 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अंबरनाथ शिवमंदिरालगतच्या प्रकाशनगरसाठी एसआरए योजना

अंबरनाथ शिव मंदिराचा विकास आराखडा आहे. या मंदिरालगतच्या प्रकाश नगरसाठी एसआरए योजना राबवून पुनर्वसन करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या एसआरएसाठी पूर्णवेळ अधिकारी नियुक्तीचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा सॅटीस प्रकल्पात समावेश

अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची जागा सॅटीस प्रकल्पात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपरिषदेच्या ऑलिंपीक दर्जाच्या जलतरण तलावासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे.

हेही वाचा

नाशिक : छगन भुजबळ यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन 

Gold Rate : सोने-चांदीच्या दरात माेठी घसरण; पाहा किती आहे दर

शेवगाव: घोटन विज वितरण उपकेंद्रातील पॉवर रोहित्रास लागली आग

Back to top button