BJP : देवेंद्र फडणवीस, “ही महाआघाडी सत्तेची लचके तोडणारी” | पुढारी

BJP : देवेंद्र फडणवीस, "ही महाआघाडी सत्तेची लचके तोडणारी"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांना लुकआऊट नोटीस देण्यात आल्याची बातमी माध्यमांमध्ये आली आहे. तसेच राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल सापडले आहे, त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP) म्हणाले की, “कायद्याच्या प्रक्रियेला सामोरे जावून अनिल देशमुख यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. करूणा शर्मा यांच्या गाडीत सापडलेले पिस्तुल, ही बाब गंभीर आहे. त्याची सखोल चौकशी व्हावी. ही आघाडी सत्तेची लचके तोडण्यासाठी आहे”, अशी टीका फडणवीस (BJP) यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

अनिल देशमुखांना लुकआऊट नोटीस

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्‍तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शंभर कोटी रुपयांच्या खंडणी घोटाळ्यात लुकआऊट नोटीस बजावल्याचे कळते. मात्र, मुंबईतील ईडीच्या अधिकार्‍यांनी या नोटिसीला दुजोरा दिलेला नाही. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्‍त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर ईडीने या गैरव्यवहाराचा तपास सुरू केला. याच तपासातून पुन्हा एकदा अनिल देशमुखांना लुकआऊट नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

करूणा शर्मांच्या गाडीत सापडली पिस्तुल

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांच्या पत्नी करुणा शर्मा बीडमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पिस्तूल त्यांचेच आहे का, तसेच याचं त्यांच्याकडे लायसन्स आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवले. तसेच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा मुंडे पोहोचल्या मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

अधिक वाचा… 

Back to top button