राऊतांवरील ‘ईडी’च्या आरोपपत्रात तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांचा उल्लेख | पुढारी

राऊतांवरील ‘ईडी’च्या आरोपपत्रात तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांचा उल्लेख

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ‘ईडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री, असा उल्लेख आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 2006-07 च्या काळात संजय राऊत यांच्या काही बैठका झाल्या होत्या. त्यातील एक बैठक तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांसोबतही झाली होती, असा हा उल्लेख आहे. बैठकांनंतर पत्राचाळ प्रकरणात विकसक राकेश वाधवान याचा सहभाग स्पष्ट झाला होता. दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी, ‘ईडी’च्या आरोपपत्रातील हा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचाच असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. घोटाळ्यातील संजय राऊत-शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस कनेक्शनची कालबद्ध मर्यादेत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत हे त्यांच्या वतीनेच काम करीत होते. पत्राचाळचे कंत्राट मिळालेल्या गुरू आशिष कंपनीत संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना आणल्याचा उल्लेखही ‘ईडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात केलेला आहे.

2006-07 मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत संजय राऊत यांनी वेगवेगळ्या बैठका घेतल्या होत्या, असे आरोपपत्रात ‘ईडी’ने म्हटले आहे. 2006-07 मध्ये शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री होते. तसेच या काळातच विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्य सरकारने या बैठकांबाबत संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसे पत्रही भातखळकर यांनी दिले आहे.

पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत या तिघांनी संगनमताने मनी लाँडरिंग केल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे. पत्राचाळ पुनर्विकासासंबंधीच्या कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर प्रवीण राऊत स्वाक्षरी करू शकत होते, तसे अधिकार त्यांना देण्यात आले होते. म्हाडासोबत वाटाघाटी तसेच इतर संबंधित विभागांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी प्रवीण राऊत यांच्यावर देण्यात आली होती, असेही या आरोपपत्रात नमूद आहे. प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनमत असल्याचेही ‘ईडी’ने नमूद केले आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प 740 कोटींचा असून, त्यात आपल्याला 180 कोटी रुपये मिळाले, असा जबाब प्रवीण राऊत यांनी याआधीच दिला आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट : अजित पवार

तपास यंत्रणांनी काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात प्रत्येकाने आपली भूमिका मांडावी. न्यायालय जो निर्णय घेईल तो घेईल, त्यामुळे आता यावर बोलणे योग्य नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हे प्रकरण ‘ईडी’ आणि राज्य तपास यंत्रणा यांच्या संदर्भातील आहे, त्यामुळे त्यामध्ये जी काय चौकशी होईल त्यात सर्व समोर येईल.

भातखळकरांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय?

गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्रीही उपस्थित होते. मराठी माणसाला बेघर करणार्‍या पत्राचाळ भ्रष्टाचाराच्या कारस्थानात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता, त्याची कालबद्ध मर्यादेत चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.

तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे पत्रही भातखळकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. म्हाडावर बाह्यशक्तीचा दबाव होता, हे या पत्रातून स्पष्ट होते, असा दावा भातखळकर यांनी केला आहे.

शरद पवारांचे नाव नाही : राष्ट्रवादीचा दावा

पत्राचाळ प्रकरणाची जी चौकशी सुरू आहे त्यात ‘ईडी’ने शरद पवार यांचे नाव घेतलेले नाही. परंतु, ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ ही भाजपची जुनीच पद्धत आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले. महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे, ते पचनी पडत नसल्याने अतुल भातखळकर यांनी नवीन बातमी पेरली आहे. मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे, हीच भूमिका भाजपची राहिली आहे. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. परंतु, नेत्यांची व पक्षाची बदनामी करण्याचा हेतू भाजपकडून साध्य होतो. फक्त सनसनाटी निर्माण करण्याकरिता भातखळकर यांनी ट्विट केले आहे, असेही तपासे म्हणाले.

Back to top button