सीएम बंगल्यात, मंत्री मंत्रालयाकडे फिरकेनात, सनदी अधिकारीही गायब, प्रशासन ठप्प | पुढारी

सीएम बंगल्यात, मंत्री मंत्रालयाकडे फिरकेनात, सनदी अधिकारीही गायब, प्रशासन ठप्प

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मंत्री मंत्रालयाकडे फिरकेनात : कोरोना महामारीच्या काळात अधिकारी आणि कर्मचार्‍यांची पंधरा टक्के असणारी उपस्थिती आता शंभर टक्क्यांवर आली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे मंत्रीही आपआपल्या सरकारी बंगल्यातून कारभार करत असल्यामुळे मंत्रालयातील प्रशासकीय कारभार ठप्प झाला आहे.

मंत्रालय हे राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असून राज्याची धोरणे, प्रशासकीय निर्णय येथे होत असतात. 2019 मध्ये विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला.

मंत्री मंत्रालयाकडे फिरकेनात

तेव्हा महत्त्वाचे काही विभाग वगळता मंत्रालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. कोरोनाचे प्रमाण कमी होताच, मंत्रालयात अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती पंधरा टक्के करण्यात आली होती. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता कोणीही मंत्री मंत्रालयाकडे फिरकत नव्हते.

सनदी अधिकारीही गायब

मुख्यमंत्री आणि मंत्री हे मंत्रालयात येत नसल्याने सनदी अधिकारी मंत्रालयातून गायब असतात. सचिवांच्या कार्यालयात चौकशी केली असता सचिव बैठकीसाठी बाहेर असल्याचे सांगितले जाते.

आता लॉकडाऊन शिथिल झाला आणि मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती 100 टक्के झाली आहे.

तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, बच्चू कडू हे तीन-चार मंत्री वगळले तर बाकीच्या मंत्र्यांनी मंत्रालयाला दांडी मारलेली आहे. महिनाभरात एखाद्या दिवशी काही मंत्री मंत्रालयात उगवतात.

बहुतांश वरिष्ठ मंत्री मुंबईत असतील तर त्यांच्या शासकीय बंगल्यावरूनच कारभार हाकतात.

अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मग संबंधित खात्यांच्या मंत्र्याच्या बंगल्यावर बैठकांना जावे लागते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः गेले काही महिने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात फिरकलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांचा कारभार हा वर्षा बंगल्यावरून सुरू आहे.

दुपारी तीननंतर वर्षा बंगल्यावर बैठका सुरू होतात. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी दुपारनंतर वर्षा बंगल्यावर असतात.

नेहमी गजबजलेला मंत्रालयातील सहावा मजला ओस पडलेला असतो. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका काही काळ मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील समिती दालनात होत असत.

मुख्यमंत्री ठाकरे वर्षा बंगल्यावरून यात सहभागी होत, तर काही मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातून सहभागी होत. पण आता ही पद्धत ही बंद झाली.

सह्याद्री अतिथीगृहातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका होत आहेत.

त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकाच्या दिवशी दिसणारे मंत्रीही आता मंत्रालयात दिसत नाहीत.

हे ही वाचलं का?

Back to top button