पाचवीपासून शालेय अभ्यासक्रमात शेतीचा विषय! कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती | पुढारी

पाचवीपासून शालेय अभ्यासक्रमात शेतीचा विषय! कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळांत लवकरच पाचवीपासून शेती हा विषय शिकविला जाणार आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सर्व संबंधितांशी चर्चा केल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना शेतीच्या कामांची माहिती मिळाली पाहिजे. म्हणजे भविष्यात जर त्यांना रोजगार मिळाला नाही तर स्वतःला शेतीकामात गुंतवून घेतील. वडिलोपार्जित व्यवसाय त्यांना करता येईल, ही त्यामागची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पाचवीपासून बारावीपर्यंत हा विषय अभ्यासक्रमात ठेवण्याचा सरकारचा विचार असल्याचे ते म्हणाले. हा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. यामध्ये शेतात फवारणी कशी करायची, सरी कशी टाकायची, पेरणी कशी करायची, जनावरांची निगा कशी राखायची, नवीन अवजारांचा वापर कसा करायचा याचा समावेश असेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी या विषयावर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा निर्णय मी जाहीर केलेला नाही. तो केवळ प्रस्ताव आहे. मंत्रिमंडळातच त्यावर चर्चा आणि निर्णय होईल, असे सत्तार यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी सत्तार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच त्यातील निर्णय बाहेर पोहोचविले गेले. त्यावरून फडणवीस यांनी त्यांना चांगलेच सुनावले होते. त्यामुळे सत्तार यांनी या निर्णयाची माहिती देताना खूपच सावधगिरी बाळगली. फडणवीस यांनी आपली कानउघाडणी वगैरे केली नव्हती. ते हसत हसतच बोलले, असेही सत्तार म्हणाले.

Back to top button