यंदाही शैक्षणिक वर्षाचा बट्ट्याबोळ होणार | पुढारी

यंदाही शैक्षणिक वर्षाचा बट्ट्याबोळ होणार

मुंबई : पवन होन्याळकर : यंदाच्या शैक्षणिक वर्षात कोरोनाचे निर्बंध कमी झाले असतानाही व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ष अद्याप सुरू झालेले नाही. नीट, जेईई आणि एमएचटी-सीईटीचा ताळमेळ बसवण्यासाठी तारखांचा झालेला घोळ आणि एआयसीटीईचा शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपासून चालू करण्याचा फतवा यामुळे यंदाही शैक्षणिक वर्षाचा बट्ट्याबोळ होणार आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या तब्बल तीन लाख जागांवर प्रवेश दिले जातात. यंदा कोरोनाचे संकट फारसे नव्हते. तरीही परीक्षा या ना त्या कारणाने लांबल्या. मे महिन्यापासून आत्तापर्यंत तब्बल आठ लाख विद्यार्थी घरी बसून आहेत.

सरकारने परीक्षा तारखांचा घोळ घातला नसता तर परीक्षा मे मध्ये घेऊन निकालही जाहीर झाले असते. ऑगस्टमध्ये परीक्षा आणि आता निकालासाठी निम्मा सप्टेंबर संपला. केवळ एमएचटी या परीक्षेसाठी राज्यातून 6 लाख 5 हजार 944 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 4 लाख 67 हजार 379 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये मुलांची संख्या 2 लाख 64 हजार 767 तर मुलींची संख्या 2 लाख 2 हजार 612 इतकी आहे. यामध्ये पीसीबी ग्रुपमधून 2 लाख 31 हजार 264 तर पीसीएम ग्रुपमध्ये 2 लाख 36 हजार 115 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

प्रवेश वेळेत झाले नाही तर शैक्षणिक वेळापत्रक कोलमडण्याची भीती आहे. सप्टेंबरमध्ये निकाल आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया एक महिना चालणार आहे. त्यानंतर महाविद्यालये सुरू होतील. इतक्या कमी कालावधीत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, असा सवालही संस्थाकडून उपस्थित केला जात आहे. पालकांनीही जोरदार आक्षेप घेतले आहेत. प्रवेश आणि सत्र परीक्षा कशा घेणार, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

शैक्षणिक सत्रांचा नेमका गोंधळ कुठे?

अभियांत्रिकी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 20 ऑक्टोबरपूर्वी जाहीर करावी, असे आदेश अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिले. यामुळे सीईटी परीक्षांचे वेळापत्रक लांबले. त्या तुलनेत बारावीनंतर विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील एफवाय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश लवकर झाले आहेत. त्यामुळे व्यावसायिक प्रवेशासाठी थांबलेले पालक गोंधळात आहेत. आता निकाल जाहीर होत असले तरी यानंतर महिनाभर प्रवेश प्रक्रिया आणि त्यानंतर वर्ग सुरू होणार आहेत. राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि डीएड, बीएड आदी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्रच कोलमडण्याची भीती आहे. फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनेक संस्थांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून मान्यताच मिळाली नसल्याने हे प्रवेशही लटकले आहेत. प्रवेश उशिरा झाले तर जादा तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांचे प्रयत्न असतात, असा दिलासा मुंबई विद्यापीठाच्या माजी अधिष्ठाता अनुराधा मजुमदार यांनी दिला.

Back to top button