नवी मुंबई महापालिकेतील माळी कामगारांचे वेतनासाठी 'भीक मांगो' आंदोलन | पुढारी

नवी मुंबई महापालिकेतील माळी कामगारांचे वेतनासाठी 'भीक मांगो' आंदोलन

नवी मुंबई; पुढारी वृत्तसेवा: नवी मुंबई महापालिकेतील उद्यान विभागातील वाशी, तूर्भे, नेरूळ येथील कामगारांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यासाठी आज (दि.१६) दुपारी ३ वाजता माळी कामगारांच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. कामगारांचे वेतन न झाल्यास शनिवारी सकाळी १० वाजता आयुक्त अभिजित बांगर यांच्या निवास्थानी आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

नवी मुंबई महापालिकेतील उद्यान विभागातील वाशी, तूर्भे, नेरूळ येथील कामगारांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. गणेशोत्सवानिमित्त ३० ऑगस्ट पर्यन्त वेतन देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. परंतु आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत तथाकथित ठेकेदारांनी वेतन दिलेले नाही.

ऐरोली विभागातील उद्यान कामगारांनी ४ वेळा मुख्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर त्यांचे वेतन दोन दिवसापूर्वी मिळाले आहे. परंतु इतर विभागातील कामगारांना वेतन दिलेले नाही. याचाच अर्थ असा होतो की, उद्यान विभागातील कामगारांनी आंदोलन केल्यानंतरच कामगारांना मासिक वेतन दिले जाईल. आज श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिकेतील कामगार मासिक वेतनासाठी भिक मांगो आंदोलन करतात. ही दुर्दैवी बाब आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button