मुंबई : पालिकेतील बदल्यांनंतर आयुक्तांचे घुमजाव | पुढारी

मुंबई : पालिकेतील बदल्यांनंतर आयुक्तांचे घुमजाव

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे महापालिका प्रशासनात बदल्या आणि नियुक्त्यांचे सत्र सुरुच आहे. सहआयुक्त व उपायुक्तांच्या बदल्यांनतर अवघ्या काही तासांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी घूमजाव करून एक सहआयुक्त आणि एक उपायुक्त यांच्या अंतर्गत खात्याची पुन्हा आदला- बदल केली. यामुळे पालिका प्रशासनामध्ये या फेरबदल्यांची पुन्हा जोरदार उटलसूलट चर्चा रंगली आहे.

पालिका आयुक्तांकडून प्रशासकीय बदल्या आणि नियुक्त्या केल्यानंतर पुन्हा यू-टर्न घेण्याची नामुष्की ओढावत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी पालिका आयुक्त चहल यांनी दोन सह आयुक्त आणि दोन उपायुक्त यांचे खातेनिहाय फेरबदल करण्यात आले होते. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी असलेले सह आयुक्त अजित कुंभार (दक्षता) यांच्याकडील शिक्षक विभागाचा अतिरिक्त कार्यभार हा पूर्णवेळ केला होता. परंतु मंगळवारची रात्र पूर्ण होत नाही, तोच आयुक्तांनी निर्णय फिरवून कुंभार यांना पुन्हा दक्षता विभागाचा कार्यभार सोपविल्यात आला. तर, उपायुक्त केशव उबाळे यांच्याकडे दिलेल्या दक्षता विभागाची जबाबदारी काढून त्यांना शिक्षक विभागाचा कार्यभार दिला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सहआयुक्तपदी असलेल्या रमेश पवार यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली होती. परंतु राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येताच 22 जुलै रोजी त्यांची या पदावरून उचलबांगडी केली. तेव्हापासून पुनर्वसनाच्या शोधात असलेल्या पवार यांच्याकडे पुन्हा एकदा सहआयुक्त सुधार या पदाचा भार सोपवताना या पदी असलेल्या केशव उबाळे यांच्याकडे आता उपायुक्त (दक्षता) विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

महापालिकेतील दक्षता विभाग हा अभियांत्रिकी विभागाकडे किंवा सनदी अधिकारी असलेल्या सहआयुक्त यांच्याकडे असणे हा अधिनियम आहे. तसे परिपत्रक आहे. परंतु या परिपत्रक आणि आजवरच्या प्रथेला छेद देत आणि विशेष म्हणजे आयुक्तांची दिशाभूल करत कुंभार यांच्याकडे असलेले दक्षता विभाग उबाळे यांच्याकडे सोपवण्यात आले. या आदेशानंतरच महापालिकेतील अभियंते आणि सनदी अधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे उबाळे यांच्याकडे सुरुवातीलाच शिक्षण विभागाचा भार सोपवता आला असता. परंतु उबाळे यांच्याकडे दक्षता विभाग यांचा भार सोपवून एकप्रकारे आयुक्तांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतल्याचे बोलले जात आहे

Back to top button