मुंबई : तुतारी, मंगला एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावणार

मुंबई : तुतारी, मंगला एक्स्प्रेस विद्युत इंजिनावर धावणार
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन सहा महिने झाले.त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने
प्रवासी गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्याचे नियोजन कोकण रेल्वेने केले आहे. पहिल्या टप्प्यात येत्या 15 सप्टेंबरपासून दादर ते सावंतवाडी तुतारी तसेच मंगला एक्स्प्रेस विद्युत इंजिनसह धावणार आहेत. त्यापाठोपाठ मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस तसेच
दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस या प्रवासी गाड्या दिनांक 20 सप्टेंबरपासून विद्युत इंजिनसह चालविण्यात येणार आहेत. यामुळे कोकण मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार असून खर्‍या अर्थाने कोकणवासीयांचा प्रवास पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त होणार आहे.

रोहा ते ठोकूर असा 700 किलोमीटर कोकण रेल्वेचा मार्ग आहे. मध्य रेल्वेवर मुंबईपासून रोह्यापर्यंत विद्युतीकरण असल्याने विद्युतप्रवाहावरील इंजिने मेल, एक्स्प्रेस गाड्यांना जोडली जात होती. रोह्यापुढे मात्र विद्युतीकरण नसल्याने पुन्हा धूर सोडणारे डिझेलवरील इंजिन जोडून मेल, एक्स्प्रेस चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच प्रदूषण होऊन पर्यावरणाला हानी पोहोचत होती. देशभरातील रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण होत असतानाच कोकण रेल्वेनेही त्यासाठी पुढाकार घेतला. रोहा ते ठोकूर अशा कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करणे हे सोपे काम नव्हते. या कामाला 2015 पासून सुरुवात झाली. 700 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण सहा टप्प्यांत करण्याचा निर्णय झाला. रोहा ते रत्नागिरी, बिजूर ते ठोकूर, कारवार ते बिजूर, कारवार ते वेरणा, वेरणा ते थिविम आणि रत्नागिरी ते थिविम असे टप्पे निश्चित करण्यात आले.

रत्नागिरी ते थिविम या शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम मार्च 2022 मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पासाठी 1 हजार 287 कोटी रुपये खर्च आला आहे. विद्युतीकरणात ओव्हरहेड वायरमधून 25 किलोवॅट एवढा उच्चदाबाचा विद्युतप्रवाह सोडला जातो.

सबस्टेशनचे काम पूर्ण

विद्युतीकरणाच्या कामापैकी सर्वांत महत्त्वाच्या सबस्टेशनची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रवासी गाड्या विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वेला लांबणीवर टाकावे लागले. मात्र आता या कामातील रत्नागिरी येथील टीएसएस ( ट्रॅक्शन सबस्टेशन) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे.

टप्प्याटप्प्याने सर्वच गाड्या विद्युत इंजिनावर

जनशताब्दी एक्स्प्रेस येत्या 15 ऑक्टोबरपासून तर मुंबई – मेंगलोर एक्स्प्रेस 1 जानेवारी 2023 पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. मुंबई सीएसटी ते करमाळीदरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस 15 ऑक्टोबर 2022 पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच गाड्या विद्युत इंजिनवर चालविण्यात येणार आहेत.

आर्थिक बचत

मुंबई ते कोकण मार्गावर अप, डाऊन अशा एकूण दररोज 20 रेल्वे धावतात. देशातून एकूण 37 रेल्वेची वाहतूक कोकणात होते. यामध्ये डिझेल इंजिनाचा समावेश असल्याने धुरामुळे प्रदूषण होते. रेल्वेगाडीला एका किलोमीटरसाठी साधारणपणे 6 ते 10 लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनाच्या अश्वशक्तीनुसार यात बदल होतो. त्यामुळे डिझेल मोठ्या प्रमाणात लागते. इंधनावरही वर्षाला 150 ते 200 कोटी रुपये खर्च होतो. विद्युतीकरणामुळे प्रदूषण कमी होण्याबरोबर आर्थिक बचत होईल. शिवाय मेल, एक्स्प्रेस गाड्यांना विद्युतवरील इंजिन जोडल्यास काहीसा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news