खेड (रत्नागिरी), पुढारी वृत्तसेवा : दसरा मेळावा शिवतीर्थावर घेऊन शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडण्याचा नैतिक अधिकार शरद पवार यांच्या विचारांनी चालणाऱ्या उद्धव ठाकरे यांना नाही, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी गुरुवारी दि.१ रोजी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केलेल्या शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह त्यांचे समर्थक खोके-खोके करून डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर आज (दि. 1) माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जामगे येथे त्यांच्या निवासस्थानी बोलताना वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, 'मातोश्री'ला खोके नवीन नाहीत, मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ज्याला कावीळ होते त्याला सगळं जग पिवळं दिसतं, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
रामदास कदम पुढे म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांना अनेक वेळा आव्हान दिले. वरळी मधून जाऊन दाखवा अशी धमकी देण्याचा प्रयत्न केला, पण सर्व आमदार गुवाहाटी व्हाया गोव्याहून मुंबईत आल्यावर वरळीमधूनच गेले. ठाकरे पिता-पुत्रांनी उठाव करणा-या आमदारांना गद्दार घोषित केले आणि मतदार संघात फिरून दाखवा असे आव्हान दिले. पण त्या सर्वच आमदारांचे त्यांच्या मतदार संघात जनतेने स्वागत केले. आमदारांनी विधानभवनात जाऊन आपले काम सुरू केले. त्यामुळे आव्हान देणाऱ्यांना कळून चुकले आहे की आपले आता काही चालणार नाही. त्यामुळे त्यांनी खोके-खोके करायला सुरवात केली आहे. आम्हाला मातोश्रीने किती खोके मिठाई खाल्ली हे माहिती आहे. मात्र तरी त्यांना डायबेटिस होत नाही ही हे आश्चर्य आहे, असा खोचक टोलाही कदम यांनी यावेळी लगावला.
जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत हे वास्तव महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावर घ्यावा, हे माझे वैयक्तिक मत आहे. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे शरद पवार यांचे विचार आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांनाच आहे, असे रामदास कदम यांनी म्हटलं आहे.