
पुढारी डेस्क : कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात (Stock Market Crash) हाहाकार उडाला. आज शेअर बाजार खुला होताच सेन्सेक्स तब्बल १,४६६ अंकांनी कोसळला होता. त्यानंतर सेन्सेक्स थोडासा सावरत ८६१ अंकांच्या घसरणीसह ५७,९७२ वर बंद झाला. तर निफ्टी २४६ अंकांच्या घसरणीसह १७,३१२ वर बंद झाला. सकाळच्या घसरणीमुळे ट्रेडिंग सत्राच्या अवघ्या काही मिनिटांत देशांतर्गत समभागांचे बाजार भांडवलाचे मूल्य ३.९७ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. गेल्या आठवड्यात बाजार भांडवल मूल्य २७६.९६ लाख कोटी होते. ते आता २७२.९८ लाख कोटी रुपयांवर आले आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीच्या शक्यतेचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. यामुळे शेअर बाजारात २ टक्क्यांची घसरण झाली. टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक हे सेन्सेक्समध्ये टॉप लूजर्स ठरले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स ०.५७ टक्क्यांनी घसरून २,६०३ रुपयांवर व्यवहार करत होते. (Stock Market Crash)
आशियातील टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग शेअर बाजारातही घसरण दिसून येत आहे. एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) शुक्रवारी ५१.१२ कोटी रुपयांचे शेअर्स ऑफलोड केले होते. दरम्यान, भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत ८०.११ एवढी निच्चांकी पातळी गाठली आहे. गेल्या शुक्रवारी (२६ ऑगस्ट) रुपया ७९.८७ वर होता.