नवी मुंबई शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात | पुढारी

नवी मुंबई शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात

नवी मुंबई;  राजेंद्र पाटील :  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात यंदा जानेवारी ते जुलैअखेर बलात्कार, विनयभंग, ठकबाजी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. मागील सात महिन्यांत एकूण 3697 गंभीर गुन्हे दाखल झाले असून 2096 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सात महिन्यांत 130 बलात्कार आणि 141 विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारी फोफावली असून घरफोडी, वाहनचोर्‍यांसह इतर गुन्ह्यांत वाढ होत
असताना शहरातील झोपडपट्टी, उरण, न्हावाशेवा, जेएनपीटी, एनआरआय सागरी पोलीस ठाणे, पनवेल शहर, पनवेल तालुका पोलीस ठाणे, तळोजा पोलीस ठाण्यांच्यातंर्गत येणार्‍या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुढे आला आहे.

या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे अधिक दाखल झाले आहेत. जानेवारी ते जुलैअखेर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 130 बलात्कार आणि 141 विनयभंगाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी बलात्कारातील सर्व 129 गुन्ह्यांतील नराधमांना अटक केली असून विनयभंग प्रकरणी 129 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. एकूण दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी
2096 गुन्हे उघडकीस आले असून सध्यस्थितीत 1601 गुन्हे पोलिसांच्या तपासावर प्रलंबित आहेत. तर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये चालू वर्षात आतापर्यंत 26 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनयभंग प्रकरणात अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयतंर्गत 20 पोलीस ठाणी असून परिमंडळ एकमध्ये 10, तर परिमंडळ दोनमध्ये 10 पोलीस ठाण्यांचा
समावेश आहे. गुन्हे शाखेची पनवेल, न्हावाशेवा, मध्यवर्ती शाखा, महापे, एपीएमसी युनिट कार्यरत आहेत. गंभीर गुन्ह्यांचा तपास हा अनेकदा पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेकडून समांतर केला जातो. परंतु, तरीही आतापर्यंतच्या तब्बल 1601 गुन्ह्यांतील
आरोपी नवी मुंबई पोलिसांना सापडत नाहीत, हे धक्कादायक वास्तव आहे.

जानेवारी ते जुलैअखेर दाखल गुन्ह्यांची आकडेवारी

महिना                      दाखल गुन्हे                 उघड गुन्हे
जानेवारी                         555                           338
फेब्रुवारी                           474                          260
मार्च                               540                           304
एप्रिल                             568                           322
मे                                 572                          320
जून                                522                          299
जुलै                               466                          253
एकूण                             3697                         2096

Back to top button