मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा बहाल | पुढारी

मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा बहाल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यासाठी विद्यापीठाला एकूण ३.६५ गुण मिळाले आहेत. हा दर्जा मिळवण्यासाठी राज्यातील इतर विद्यापीठांच्या एकूण तुलनेत सर्वाधिक असे गुण मुंबई विद्यापीठाने मिळवले आहेत. याची घोषणा नॅककडून आज अधिकृतरित्या करण्यात आल्यानंतर विद्यापीठातील व्यवस्थापन सदस्य, सिनेट सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी त्यासोबतच सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या या दर्जाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे.

मुबई विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनाची मुदत २० एप्रिल २०१७ रोजी संपली होती. गेली दोन वर्ष लॉकडाऊनमुळे ही प्रकिया पार पडू शकली नव्हती. यामुळे विद्यापीठातील अनेक शैक्षणिक उपक्रमांना खीळ बसली होती. तर दुसरीकडे विद्यापीठात असलेल्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही याचा मोठा फटका बसला होता.

२४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत ही समितीने पाहणी केल्यानंतर आता अधिकृत घोषणा झाली. मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ दर्जा मिळाल्याने विद्यापीठातील संशोधन प्रकल्प, विविध प्रकारचे अनुदानाचे प्रकल्प यासोबतच विद्यापीठात इतर विद्यापीठांच्या करारावर सोबतच शैक्षणिक देवाण – घेवाण असे अनेक मार्ग यापुढे खुले होणार आहेत. तसेच हा दर्जा मिळाल्याने मुंबई विद्यापीठ हे पुन्हा एकदा देशातील नामांकित विद्यापीठाच्या श्रेणीत जाऊन बसेल. हा मिळालेला दर्जा राज्यात सर्वोत्कृष्ठ असून सर्व मुंबईकरांचा मानाचा असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी म्हटले आहे.

विद्यापीठाला हा सर्वोत्कृष्ठ दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठातील अनेक महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम, संशोधनाचे कामकाज त्यासोबतच विविध प्रकारच्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जामध्ये ही मोठी सुधारणा होण्यास मदत मिळणार असल्याचा विश्वास व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून व्यक्त केला आहे.

हेही वाचले का?

Back to top button