मुंबई : रेल्वे विकणार चक्‍क प्रवाशांचा डेटा! | पुढारी

मुंबई : रेल्वे विकणार चक्‍क प्रवाशांचा डेटा!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  महसूल वाढविण्यासाठी भारतीय रेल्वे विविध योजना राबवित आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) डिजिटल मॉनिटरीगच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याची योजना आखली आहे. यासाठी निविदा देखील मागविण्यात आल्या आहेत. परंतु यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आयआरसीटीसी यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करणार आहे. वापरकर्त्यांचा डेटा मॉनिटाईझ करण्याच्या पद्धतींबद्दल सल्लागार आयआरसीटीसीला मदत करतील. आयआरसीटीसीकडे वापरकर्त्यांचा 100 टीबीहून अधिक डेटा आहे. तिकीट बुक करणार्‍यांच्या नावापासून त्यांच्या फोन क्रमांकापर्यंतची माहिती आयआरसीटीसीकडे आहे

काय होणार?

 आयआरसीटीसीकडे असलेल्या प्रवाशाचा तपशील वापरण्यात येणार आहे. प्रवासी रेल्वेत असताना ई- कॅटरिंगचा वापर करतात. या प्रवाशांना भविष्यात प्रवासादरम्यान ई-कॅटरिंग कंपन्यांची नोटिफिकेशन येऊ शकतात. ट्रेनमधून उतरल्यानंतर प्रवासी स्टेशनहून घरी जाण्यासाठी कॅबचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांना कॅबचे नोटिफिकेशन किंवा सजेशन येऊ शकतात. यासाठी आयआरसीटीसी थर्ड पार्टीसोबत वापरकर्त्यांचा डेटा शेअर करेल आणि त्यातून पैसे कमवेल.

अनेक प्रश्नांचा गुंता!

आयआरसीटीसी प्रवाशांचा डाटा विकणार म्हणजे नेमके काय करणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रवाशाची गोपनीय माहिती विकणार का या प्रश्नचे उत्तर सहज देणे अवघड आहे. कंपनी डेटावरील आपले नियंत्रण कधीही सोडणार नाही. याचा अर्थ आयआरसीटीसीकडे असलेला तुमचा डेटा कधीही विकला जाणार नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून हेच स्पष्ट होत आहे.
कारण डेटा विकून केवळ एकदाच कमाई होते. आयआरसीटीसीने यापुढची योजना आखली आहे. कंपनी वेळोवेळी डेटाचा वापर
पैसे कमावण्यासाठी करणार आहे.

योजनेमुळे शेअरमध्ये वाढ

आयआरसीटीसीने ही योजना राबविण्याचा निर्णय घेताच शेअरचा दर शुक्रवारी चार टक्क्यांनी वाढला. मुंबई शेअर बाजारात सकाळी उलाढाल सुरू झाली त्यावेळी आयआरसीटीसीचा शेअर 712 रुपये होता. थोड्याच वेळात तो 746.75 रुपयांवर पोहोचला.

Back to top button