मुंबई: नारळपाणी विक्रेत्याने वाचवले प्राण; गीतांजली इमारत दुर्घटना | पुढारी

मुंबई: नारळपाणी विक्रेत्याने वाचवले प्राण; गीतांजली इमारत दुर्घटना

मुंबई; प्रकाश साबळे: बोरिवलीत शुक्रवारी दुपारी कोसळलेल्या गितांजली इमारतीमधील दोन कुटुंबियांचे जीव येथील नारळपाणी विक्रेता संतलाल मोर्या याच्या सतर्कतेमुळे वाचले. मोर्या यांना इमारतीचा काही भाग कोसळत असल्याचा आवाज आला. पिलरमधून सिमेंट बांधकाम पडत असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ इमारतीमध्ये धाव घेवून इमारत कोसळत असल्याचे रहिवाशांसह इमारतीमधील सुरक्षारक्षकाला सांगितले.

खबरदारी म्हणून तळमजल्यावर वास्तव्य करणार्‍या दोन कुटुंबियांनी सकाळी 10.15च्या दरम्यान आपल्या सामानह इमारत खाली केली. 12.25 च्या दरम्यान गितांजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली. जर संतराम यांनी सतर्कता दाखविली नसती, तर तळमजल्यावर राहणार्‍या दोन कुटुंबियांतील 6 ते 7 जणांचाबळी गेला असता. बोरिवली येथील रत्नाबाई चाळ, नेहरू गार्डन येथे वास्तव्यास असलेले संतलाल मोर्या हे गेल्या 25 वर्षांपासून गितांजली इमारतीलगत असलेल्या फुटपाथवर नारळपाणी विक्रीचा धंदा करतात. ते सकाळी 7 वाजताच दुकान उघडतात.

नेहमीप्रमाणे त्यांनी शुक्रवारी दुकान उघडल्यावर त्यांना गितांजली इमारतीमधून काही तरी पडत असल्याचा आवाज येत होता. त्यांना इमारतीमधून दगड पडल्याचे दिसून आले. यामुळे त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. त्यांनी तात्काळ इमारतीमध्ये धाव घेवून सुरक्षारक्षक आणि इमारतीमधील रहिवाशांना सदर प्रकार सांगितला. यानंतर इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये इमारत एका बाजूला सरकत असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत परिसरातील नागरिक आणि व्यापार्‍यांकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

Back to top button