‘मंत्री तुम्ही तुमच्या घरी’, तुम्ही चौकात उभे आहात काय? नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं; म्हणाल्या, ‘आधी खाली बसा! | पुढारी

‘मंत्री तुम्ही तुमच्या घरी’, तुम्ही चौकात उभे आहात काय? नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापलं; म्हणाल्या, ‘आधी खाली बसा!

पुढारी ऑनलाईन: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शांत आणि संयमी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कमालीच्या संतापल्याचं यावेळी पाहायला मिळालं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना झापलं. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, अशा कठोर शब्दांत त्यांनी झापलं. तुम्ही छातीवर हात ठेवून कसलं बोलता, सभागृहात बोलण्याची ही योग्य पद्धत नाही, असंही त्यांनी म्हटलं. यावेळी झालेल्या गदारोळात विरोधकही पुन्हा वेलमध्ये उतरले होते. विधान परिषदेत जोरदार गदारोळ यावेळी पाहायला मिळाला. शेवटी चंद्रकांतदादा पाटील यांना हस्तक्षेप करावा लागला.

विधान परिषदेत नेमकं काय घडलं?

विधान परिषदेत महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना त्रुटी पूर्ततेनंतर अनुदान मंजूर करण्याबाबतच्या विषयावर चर्चा सुरु होती. चर्चेदरम्यान अनुदान मंजूर का केलं नाही? असा सवाल विरोधी पक्षाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारला. यावर प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी फाईल अर्थ विभागाकडं पाठवली असल्याचं सांगितलं. याला आक्षेप घेत विरोधकांनी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फाईलवर सही केली असताना देखील आता फाईल पुन्हा अर्थ विभागाकडं का पाठवली? असं विचारलं. या मुद्यावरुनच सभागृहात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. या गोंधळा दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील बोलत असताना त्यांना खाली बसण्याची विनंती उपसभापती निलम गोऱ्हे करत होत्या. मात्र, तरीही ते बोलतच होते. यावरून गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळालं. तुमची सभागृहात वागायची ही कोणती पद्धत? तुम्ही काय रस्त्यावरच्या चौकात उभे आहात काय? हे सभागृह आहे, असे म्हणत नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना झापलं.

चंद्रकांतदादांनी केला हस्तक्षेप

हा प्रश्न दिपक केसरकर यांच्याशी संबधीत शिक्षण विभागाचा आहे. तुम्ही खाली बसा अशी विनंती उपसभापती निलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांनी केली. त्यावेळी चुकीच्या पद्धतीने गुलाबराव पाटील हे हातवारे करुन सभागृहात बोलत होते, त्यामुळं त्यांनी लगेच खाली बसावे असे गोऱ्हे म्हणाल्या. नेमकं यावेळी विरोधक आणि सत्ताधारी समोरासमोर येऊन गोंधळ घालत होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना समज द्यावी असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. यावर चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत हस्तक्षेप केला. तसेच सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती करत खाली बसण्याचे आवाहन केले.

Back to top button