MD Drugs : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई : १ हजार २६ कोटींचे एमडी ड्रग्ज गुजरातमधून जप्त | पुढारी

MD Drugs : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई : १ हजार २६ कोटींचे एमडी ड्रग्ज गुजरातमधून जप्त

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : नालासोपारा येथून एमडी ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या प्रेमप्रकाश सिंह याच्या चौकशीतून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वरळी कक्षाने गुजरातमधून तब्बल १ हजार २६ कोटींचे ५१३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. या कारवाईमध्ये पोलिसांनी गिरीराज दीक्षित याला अटक केली आहे. त्याच्याकडून एमडी तयार करण्याच्या प्रक्रियेतील ८१२ किलो पांढऱ्या रंगाची पावडर आणि ३९७ किलो वजनाचे तपकिरी रंगाचे खडे जप्त केले आहेत. गुन्हे शाखेच्या या कारवाईने बाजारात विक्रीसाठी येणारा अंमली पदर्थांचा साठा वेळीच रोखला गेला आहे.

मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी येथून शमशुल्ला खान (वय ३८) या ड्रग्ज तस्कराला २५० ग्रॅम एमडीसह ताब्यात घेत अटक केल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वरळी कक्षाने ड्रग्ज विक्रीची ही साखळीच शोधून काढली आहे. वरळी कक्षाने याप्रकरणात अयुब शेख (वय ३३), रेश्मा चंदन (वय ४९) आणि रियाझ मेमन (वय ४३) यांना अटक केली आहे. त्यांच्या पाठोपाठ ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या ऑरगॅनिक रसायनशास्त्रातील पदवीधर प्रेमप्रकाश सिंह (वय ५२) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल १ हजार ४०३ कोटींचे तब्बल ७०१ किलो एमडी जप्त केले होते. प्रेमप्रकाश हा वेगवेगळ्या फॅक्टरीमधून ड्रग्ज बनवून घेत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. याच माहितीच्या आधारे वरळी कक्षाने अंबरनाथमधील फॅक्टरीचा व्यवस्थापक किरण पवार (वय ५३) याला बेड्या ठोकल्या होत्या.

प्रेमप्रकाश याने पोलिसांच्या चौकशीत गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुक्यातील पानोली येथील जीआयडीसीमध्ये असलेल्या आणखी एका फॅक्टरीचे नाव उघड केले. प्रेमप्रकाश हा गेल्या वर्षभरापासून फॅक्टरीचे मालक गिरीराज दिक्षित याच्याकडून एमडी बनवून घेत होता. त्यानुसार गुन्हेशाखेच्या पथकाने १३ ऑगस्टरोजी या फॅक्टरीवर छापेमारी केली. या कारवाईत गुन्हेशाखेने गिरीराज दिक्षित याला ताब्यात घेत ५१३ किलो एमडी ड्रग्जसह एमडी तयार करण्याच्या प्रक्रियेतील ८१२ किलो पांढऱ्या रंगाची पावडर आणि ३९७ किलो वजनाचे तपकीरी रंगाचे खडे असा करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हेशाखा आता कोठडीमध्ये असलेल्या प्रेमप्रकाश सिंह याच्यासोबत गिरीराज दिक्षित याच्याकडेही कसून चौकशी करत आहे.

प्रेमप्रकाश हा फॅक्टरीमधील एका बड्या अधिकाऱ्याला हाताशी धरुन फॅक्टरीमध्ये ड्रग्ज बनवून घेण्यासाठी डील करत होता. प्रेमप्रकाश याने याआधी म्हणजेच 2019 पासून अंबरनाथमधील फॅक्टरीमधून एमडी ड्रग्ज बनवून घेतले होते. त्यानंतर गेले वर्षभर तो गुजरातमधील फॅक्टरीमधून ड्रग्ज बनवून घेत होता.

ड्रग्जबाबत कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून प्रेमप्रकाश हा अर्धा माल स्वतः बनवून फॅक्टरीमध्ये न्यायचा. त्यानंतर बाजारात सहज उपलब्ध होणारी केमिकल या फॅक्टरीला आणायला सांगून ती त्यात मिक्स करून घेत तयार झालेले एमडी ड्रग्जचे उत्पादन फिनिश करुन पॅकिंग करुन घेऊन जायचा, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या वरळी कक्षाने ड्रग्ज बनवून विक्री करणाऱ्या या रॅकेटचा मास्टरमाईंड ऑरगॅनिक रसायनशास्त्रातील पदवीधर प्रेमप्रकाश सिंह याच्यासह एकूण ०७ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून तब्बल २ हजार ४३५ कोटी रुपये किंमतीचे १ हजार २१८ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.

 

Back to top button