दोन बांगलादेशींना मुंबईत अटक; अंधेरी, मालाड येथे कारवाई

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अंधेरी आणि कुरार पोलिसांनी अटक केली. अश्रफउल्ल उमर फारुख मारुफ आणि शाहिद अलीमुद्दीन खान अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील शाहिद हा एका अ‍ॅपच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबिय आणि नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याने अशा नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश वरिष्ठांनी सर्वच पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या एटीएस पथकाने अशा बांगलादेशी नागरिकांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात सुरुवात केली होती. ही कारवाई सुरु असताना अंधेरी आणि मालाड परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अंधेरी पोलिसांनी अंधेरीतील नवीन नागरदास रोड, पिंकी सिनेमागृहाजवळ अश्रफउल्ल मारुफ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले.

व्यवसायाने प्लंबर असलेला अश्रफउल्ल हा अंधेरीतील गिल्बर्ट हिल, जुहू गल्लीत राहत होता. दुसर्‍या कारवाईत कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने, पोलीस शिपाई कदम, घरत, प्रमोद टेकवले यांनी शाहिद खान याला पुष्पा पार्क सबवे परिसरातून अटक केली. चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. तो सध्या मिरारोड येथील वारिस हॉस्पिटलजवळील इंद्रलोक चाळीत राहतो. त्याच्याकडे पोलिसांना एक मोबाईल सापडला असून या अ‍ॅपच्या माध्यमातून तो त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांच्या संपर्कात होता.

Exit mobile version