पालिकेतील पिता-पुत्रांची सत्ता उलथवून टाकू : आशिष शेलार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे आणि घराणेशाही हद्दपार करण्याचे विधान केले आहे. एका अर्थाने त्यांनी मुंबईकरांच्या मनातील भावनाच बोलून दाखविली आहे. मुंबई पालिकेच्या येत्या निवडणुकीत पिता-पुत्राची सत्ता उलथवून टाकू, असे मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेत 25 वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता आहे. मी नाहीतर माझा मुलगा, अशा पद्धतीने इथला कारभार चालू आहे. या घराणेशाहीने भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. महापालिकेत लोकशाही मूल्यावर आधारित काम झालेच पाहिजे, असे सांगतानाच मुंबई महापालिका निवडणूक आम्ही एकत्र लढू आणि जिंकू असा दावा शेलार यांनी केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुका शिंदे गट आणि भाजप एकत्रितपणे लढविणार का, या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे शेलारांनी टाळले. महापालिका निवडणुका एकत्र लढविण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील असे सांगून शेलार म्हणाले, आताची खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे. शिंदे यांनीही घराणेशाही नको अशीच भूमिका मांडली आहे. लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराला स्थान नसावे, असेच त्यांचे मत आहे, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version