पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांची रायगड जिल्ह्यात संवाद यात्रा | पुढारी

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांची रायगड जिल्ह्यात संवाद यात्रा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या तिसर्‍या टप्प्यात रायगड जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बुधवार, 17 आँगस्ट रोजी आपल्या यात्रेत ते रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि महाड येथील मेळाव्यांना संबोधित करणार आहेत. विशेष, म्हणजे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनसुद्धा याच दिवशी सुरू होत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदित्य ठाकरे विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेतील बंडाळी आणि राज्यातील सत्तांतरानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या विविध भागात शिवसंवाद यात्रा काढण्यास सुरूवात केली आहे. विशेषतः शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सभा-मेळावे घेत ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर हल्लाबोल करण्याचे धोरण स्वीकारले आहे. याच शिवसंवाद यात्रेच्या तिसर्‍या टप्प्यात अलिबाग आणि महाड येथील मेळाव्यांना ठाकरे संबोधित करणार आहेत.

विशेष म्हणजे 17 तारखेपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. यात शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने येणार का, राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचे पडसाद सभागृहात उमटणार का, अशा चर्चांना सुरूवात झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यात्रेला जाणार असल्याने ते सभागृहात उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे विधानसभेतील राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा किल्ला अन्य शिवसेना आमदारांना लढवावा लागणार असल्याचे दिसते.

Back to top button