मुंबई : शिंदे गटाला हवे ग्रामविकास अन् आरोग्य | पुढारी

मुंबई : शिंदे गटाला हवे ग्रामविकास अन् आरोग्य

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता मंत्र्यांचे खातेवाटप रखडले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या खात्यांसह ऊर्जा, आरोग्य, ग्रामविकास आणि सार्वजनिक बांधकाम या महत्त्वाच्या खात्यांचा हट्ट शिंदे गटाने भाजपकडे धरला आहे. दरम्यान, मंत्र्यांचे खातेवाटप सोमवारी जाहीर होऊ शकते, असे राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. दुसरीकडे बुधवारपर्यंत याबाबतची घोषणा होईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारच्या शपथविधीनंतर तब्बल 38 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले तरी खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे सर्व मंत्री अद्याप बिनखात्यांचे आहेत. मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना दिल्याने भाजपला जास्तीत जास्त खाती देण्याचे ठरले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेली खाती शिंदे गटाला मिळणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडील खाती भाजपच्या वाट्याला जाणार आहेत. शिवसेनेकडील नगरविकास, राज्य रस्ते विकास, उद्योग, पर्यावरण, पर्यटन, परिवहन, पाणीपुरवठा, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, वने आदी खाती शिंदे गटाला मिळणार आहेत. या बरोबर
अल्पसंख्याक खातेही शिंदे गटाकडे असेल. सुरुवातीला गृह खात्याची मागणी शिंदे गटाने केली होती; परंतु गृह खाते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे ठेवणार आहेत. आता ऊर्जा, आरोग्य, ग्रामविकास आणि सार्वजनिक बांधकाम या खात्यांवर शिंदे गटाने हक्‍क सांगितला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले होते; परंतु महत्त्वाची खाती राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या वाट्याला
गेली होती. त्यामुळे या महत्त्वाच्या खात्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. वैद्यकीय शिक्षण खाते भाजपने स्वतःकडे घ्यावे आणि आरोग्य खाते शिंदे गटाला द्यावे,अशीही मागणी आहे. पण भाजप यातील कोणतेही खाते सोडण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा कायम आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यामुळे त्यापूर्वी खातेवाटप जाहीर होणे गरजेचे आहे. खातेवाटप
झाल्याशिवाय मंत्र्यांना त्यांच्या कार्यालयातील नियुक्त्या करता येणार नाहीत. तसेच अधिवेशनापूर्वी संबंधित खात्याचा आढावा
घ्यावा लागणार आहे.

Back to top button