सातारा : मक्याच्या शेतातच अतिरेक्यांचा खात्मा; या धाडसी पराक्रमाबद्दल मारुती मोरे यांना मिळाले होते सेना मेडल | पुढारी

सातारा : मक्याच्या शेतातच अतिरेक्यांचा खात्मा; या धाडसी पराक्रमाबद्दल मारुती मोरे यांना मिळाले होते सेना मेडल

सातारा; पुढारी वृत्तसेवा ; 5 मराठा बटालियनचे ऑनररी कॅप्टन मारुती लक्ष्मण मोरे (निवृत्त) यांच्या धाडसाचे अनेक किस्से असून त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे अतिरेक्यांना कापरं भरायचं. राजापूरी, ता. सातारा हे त्यांचे गाव. मारूती मोरे यांना 2003 मध्ये सेना मेडलने गौरवले होते. त्याला कारणही तसेच होते. 17 राष्ट्रीय रायफल्समध्ये पुंछ सेक्टर येथे त्यांच्या नेतृत्वाखालील एका ऑपरेशन मोहिमेत मक्याच्या शेतात घुसून सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या या थरारक मोहिमेची दखल घेऊनच त्यांना गौरवण्यात आले होते.
शांतीसेनेसाठी सैनिकाबरोबर काम

लक्ष्मण मोरे यांनी मराठा बटालियनसोबत 1987 मध्ये तीन वर्षे श्रीलंका देशात शांती सेनेसाठी त्यांच्या सैनिकांबरोबर काम केले. त्यानंतर ते 2007 ते 2008 या एक वर्षासाठी युएन मध्ये शांती सेनेत सहभागी झाले होते. त्यांनी लष्करी सेवेत असताना अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत.

मारूती मोरे यांच्या सैन्यदलातील कर्तबगारीचे अनेक किस्से आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सैनिकांच्या अनेक मोहिमा फत्ते झाल्या आहेत. पुंछ सेक्टरमधील अराई गावालगत 29 सप्टेंबर 2001 मध्ये रात्री साडेनऊ वाजता मक्याच्या शेताजवळ जवानांनी सापळा लावला होता.
तासाभरात एक अतिरेकी 100 मीटर अंतराजवळून पाऊलवाटेने जाताना दिसला. या अतिरेक्याला शरण येण्यास सांगताच अतिरेक्याने मक्याच्या शेतात लपत अंदाधुंद गोळीबारास सुरुवात केली. गोळीबाराच्या आवाजावरुन शेतात अतिरेक्यांची संख्या अधिक असल्याचे लक्षात आले.

याचवेळी मक्याच्या शेताला वेढा देऊन एके 47 व रॉकेट लॉन्चरच्या सहाय्याने 17 राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीने सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले.

या मोहिमेत एकूण 14 जवान सहभागी झाले होते. ही धुमचक्री पहाटेपर्यंत सुरु होती. या तुकडीचे नेतृत्व करीत होते 5 मराठा बटालियनचे ऑनररी कॅप्टन मारुती लक्ष्मण मोरे (निवृत्त). त्यांच्या या अत्युच्च अशा धाडसी कामगिरीबद्दल राजापुरी, ता. सातारा यथील मारूती मोरे यांना 2003 मध्ये सेना मेडलने गौरवले.

Back to top button