दाऊदचा गँगस्टर फहीम मचमच याचा कोरोनामुळे मृत्यू | पुढारी

दाऊदचा गँगस्टर फहीम मचमच याचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा खास हस्तक छोटा शकील याचा विश्वासू गँगस्टर फहीम मचमच (51) याचा शुक्रवारी सायंकाळी पाकिस्तानातील कराचीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

फहीम मचमच याला गेल्या काही दिवसांपासून स्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. वैद्यकीय तपासणीमध्ये त्याला कोरोना झाल्याचे उघड झाले. उपचारांदरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

शनिवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डी कंपनीकडून याची माहिती गँगस्टर फहीम मचमच याच्या मुंबईतील भेंडी बाजार येथे राहात असलेल्या कुटुंबीयांना देण्यात आल्याचे समजते.

डीफफ कंपनीत दाऊद, छोटा शकिलनंतर छोटा राजनचे स्थान होते. मात्र राजनने डी कंपनी सोडल्यानंतर फहिमने त्याची जागा घेतली. मुंबईतील प्राँपर्टी रिडेव्हलपर असलेल्या फहिमचे नाव 2003 मध्ये सर्व प्रथम प्रसिद्धी झोतात आले. फहिम मचमचने एका विकासकाकडून जबरदस्ती पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. दाऊदसाठी हप्ते वसूली करणारा फहिम हा प्रचंड बडबड्या होता. त्यामुळेच त्याला मचमच हे टोपण नाव पडले.

फहीम मचमच याच्याविरोधात मुंबईसह देशभरात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकावणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. फहिम हा डी कंपनीसाठी शार्प शूटरची भरती करत होता. सूञांनी दिलेल्या माहितीनुसार फहिमने काही वर्षांपासून यूपी, रत्नागिरी, मध्यप्रदेश, कुर्ला, गोवंडी, साकीनाका, पंजाब, राजस्थान या राज्यातून 2018 मध्ये तरुणांची भरती डी कंपनीत केली होती.

गुन्हे शाखेने 1995 मध्ये फहीमला अटक केली होती. मात्र न्यायालयाने फहीमला जामीन मंजूर केला. दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच वर्षी त्याला पुन्हा विमानतळावरुन अटक करण्यात आली.

फहीमला जामीन मिळाल्यास तो देश सोडून पळून जाईल असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. मात्र फहीमला पुन्हा एकदा जामीन मंजूर करण्यात आला. फहीमने या संधीचा पुरेपूर वापर केला आणि तपास यंत्रणाना कधीही तिसरी संधी दिली नाही. फहीम दुबई मार्गे कराचीला गेला तो कायमचाच.

Back to top button