मुंबई : १ कोटीचे सोने घेऊन कारागीर पसार | पुढारी

मुंबई : १ कोटीचे सोने घेऊन कारागीर पसार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : दागिने घडवण्यासाठी दिलेले 1 कोटी 09 लाख रुपये किमतीचे 2 हजार 383 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन कारागिराने पळ काढल्याची घटना भायखळा येथे घडली आहे. याप्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करून भायखळा पोलीस तपास करत आहेत.

माझगावमध्ये कुटुंबासोबत राहात असलेल्या जैन (44) यांचा येथील दादोजी कोंडदेव क्रॉस रोड येथे सोन्याचे दागिने घडवण्याचा कारखाना आहे. तर, झवेरी बाजार येथे दागिन्यांचे दुकान आहे. कारखान्यातील काम जैन यांचे एक नातेवाईक पाहतात. तर, याठिकाणी एका व्यवस्थापकासह एकूण 17 कारागीर काम करत होते. यातील राजकुमार नावाच्या एका कारागिराने सहा महिन्यांपूर्वी त्याच्या ओळखीच्या राजेश कैलाशी (19) याला कामासाठी आणले होते.

नेहमीप्रमाणे 12 ऑगस्टला राजकुमार आणि कैलाशी यांच्याकडे दागिने घडवण्यासाठी 2 हजार 383 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तारा दिल्या. त्यानंतर दोन दिवसांनी राजकुमार हा नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचे सांगून गावी निघून गेला. तसेच 15 ऑगस्टपासून कैलाशी सुद्धा कामावर आला नाही तसेच दागिने घडवण्यासाठी दिलेले 1 कोटी 09 लाख रुपये किमतीचे 2 हजार 383 ग्रॅम वजनाचे सोनेही कारखान्यात सापडले नाहीत.

कैलाशी याचा मोबाईल बंद येत होता. तो शोध घेऊनही न सापडल्याने त्यानेच हे दागिने घडवण्यासाठी दिलेले सोने घेऊन पळ काढल्याची जैन यांची खात्री पटली. अखेर जैन यांनी भायखळा पोलीस ठाणे गाठून कैलाशीविरोधात तक्रार नोंदवली.

Back to top button